खालापूर ः प्रतिनिधी
खोपोलीतील अल्ट्रा लायब्रोटेरीज कंपनीला लागलेल्या आगीनंतर अवघ्या महिन्याभरात खालापुरातील आत्करगांव येथील डीपीसीएल केमिकल या मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीला बुधवारी (दि. 13) दुपारी अचानक आग लागली. या बंद कारखान्यात 400 च्या आसपास ड्रम केमिकल साठवण केला होता. तो संपूर्ण साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. धुराचे लोट चार किमी अंतरावरून दिसत होते. त्यामुळे आत्करगांव, आडोशी, होनाड, चिंचवली व आसपासच्या गावातील रहिवाशी भितीच्या सावटाखाली होते. खोपोली अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी खालापूर, रसायनी औद्योगिक वसाहतीमधील सहा, तर खोपोली अग्निशमन दलाने दोन बंब यांच्या प्रयत्नाने फोमच्या साह्याने दोन तासांत पूर्ण आगीवर नियंत्रण मिळवले. बंद कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे साठवणूक केली जात असून मार्च-एप्रिलमध्ये या साठ्यांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ढेकू औद्योगिक वसाहतीमधील मागील काही वर्षात किमान 11 रसायनिक कारखान्यात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.