अलिबाग : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चव्हाण यांनी पनवेल येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. रायगड जिल्हयातील या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांनी कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी जाऊन रस्त्याच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागातील अनेक परिसरांमध्ये पावसामुळे पडलेल्या खड्डयांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी खड्डे युध्दपातळीवर बुजविण्याच्या दृष्टीने “रेडीमिक्स” या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशा पध्दतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवतात याचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखविण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत युद्धपातळीवर प्रयत्न करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे सक्त आदेश मंत्रीमहोदयांनी संबंधित विभाग व कंत्राटदारांना दिले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …