Breaking News

कोरोना काळात मविआ सरकारचा मंत्र्यांच्या उपचारावर लाखोंचा खर्च

चक्क सरकारी तिजोरीतून भरली बिले;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे वृत्त झी 24 तास वाहिनीने दिले आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
‘झी 24 तास’च्या वृत्तानुसार राज्य सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. गेली दोन वर्षे कोरोना काळात सर्वसामान्य लोक उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल एक कोटी 39 लाख खर्च केले, पण हे उपचार सर्वसामान्यांच्या खर्चावर झाल्याने आता वाद निर्माण झाला आहे.
या 18 पैकी सर्वाधिक नऊ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यानंतर काँग्रेसचे सहा आणि शिवसेनेचे तीन मंत्री आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश आहे. टोपेंच्या उपचारासांठी तब्बल 34 लाखांचा खर्च आला असून हे पैसेही सरकारी तिजोरीतून भरण्यात आले आहेत.
मंत्र्यांच्या उपचारावर असा झाला खर्च
सरकारी तिजोरीतून उपचारांचा खर्च करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे (34 लाख) यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (17 लाख 63 हजार), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (14 लाख 56 हजार), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (12 लाख 56 हजार), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (11 लाख 76 हजार), अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (नऊ लाख तीन हजार) पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (आठ लाख 71 हजार), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सात लाख 30 हजार), उद्योगमंत्री सुभाष देसाई (सहा लाख 97 हजार) आणि परिवहनमंत्री अनिल परब (सहा लाख 79 हजार) यांचा समावेश आहे. याशिवाय या यादीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री संजय बनसोडे, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. त्यांनी दोन लाखांपर्यंत उपचार घेतले आहेत तसेच आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी एक लाखापर्यंतचा खर्च केला आहे, तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी 50 हजारांच्या आसपास उपचार घेतले आहेत.
आठ रुग्णालयांमध्ये घेतले उपचार
बॉम्बे हॉस्पिटल (41 लाख), लिलावती हॉस्पिटल (26 लाख), ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल (15 लाख), जसलोक हॉस्पिटल (14 लाख), फोर्टिस हॉस्पटल (12 लाख), अवंती हॉस्पिटल (सात लाख), ग्लोबल हॉस्पिटल (चार लाख), अनिदीप हॉस्पिटल (दोन लाख).

 

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply