Breaking News

‘दोस्त’ @50; गाडी बुला रही है….

पारंपरिक लोकप्रिय चित्रपटातील एक हुकमी गोष्ट, मैत्री अथवा दोस्ती (फ्रेन्डशीप), चित्रपटाचे नाव, थीम (अर्थात गोष्ट), संवाद, गाणी यातून मोठ्याच प्रमाणावर रुपेरी पडद्यावर ’मैत्री’चा छान प्रवास आहे.
दोस्ती, संगम, नमक हराम, शोले, आदमी सडक का, साजन, दिल चाहता है, जिंदगी नही मिलेगी दोबारा, दो यार, यारों का यार, दोस्ताना, दोस्त दुश्मन अशा अनेक चित्रपटांत मैत्रीच्या अनेक गोष्टी दिसल्या. विशेष म्हणजे ’मैत्रीची गोष्ट’ असलेले अनेक चित्रपट सुपरहिट. (चित्रपटाच्या यशाचा असा हुकमी फॉर्मुला नसतो. अमूक अमूक केले की हाऊसफुल्ल गर्दी होते याचे कोणतेही मेजरमेंट वा थर्मामीटर नाही, पण प्रत्यक्ष समाजात मैत्री घटक माणसाला जणू एक प्रकारचा ऑक्सिजन देत असल्याने पडद्यावरच्या मैत्रीत स्वतःला पाहत असावेत. हा एक प्रकारचा वास्तववाद.)
जहा यार नही वहा प्यार नही, जहा प्यार नही वहा यार नही असे मैत्रीवरचे संवाद कायमच गाजले. (नमक हराम) दिये जलते है, फुल खिलते है, बडी मुश्किल से मगर दोस्त मिलते है (नमक हराम), यह दोस्ती हम नहीं तोडेंगे (शोले), बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा यासारखी घट्ट मैत्रीची गाणी फ्रेन्डशीप डेला हुकमी. त्याच वेळेस दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा (संगम), दुश्मन ना करे दोस्त ने ये काम किया है (आखिर क्यू) अशीही मैत्रीची वेगळी बाजू दाखवणारी गाणी आली.
या सगळ्या ’मैत्री’च्या गोष्टीतील एक चित्रपट सुचित्रा चित्रचा दोस्त. मुंबईत रिलीज 12 एप्रिल 1974. म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण. मुंबईत मेन थिएटर गंगामध्ये रौप्य महोत्सवी यश.
या चित्रपटाचे निर्माते प्रेमजी आणि दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी दुश्मन (1972)च्या खणखणीत यशानंतर दोस्त या चित्रपटावर लक्ष केंद्रित केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, ’दुश्मन’चा नायक सुपरस्टार राजेश खन्नाच्या हस्ते ’दोस्त’चा 1 जून 1972 रोजी मुहूर्त केला. धर्मेंद्रचा अजून पूर्णपणे ही मॅन झाला नव्हता. सोबर धर्मेंद्र कात मात्र टाकत होता. तरी हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’सत्यकाम’, मोहन सैगल दिग्दर्शित ’देवर’, प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ’नया जमाना’ अशा चित्रपटातील त्याच्या व्यक्तीरेखा आदर्शवादी होत्या. एक प्रकारचा तो समाजसुधारक साकारत होता. त्या काळाचा महिमा सत्यवचनी होता. ढिश्यूम ढिश्यूम संस्कृती अजून पूर्ण स्वीकारलेली नव्हती. नेमक्या त्याच्या याच प्रतिमेनुसार ’दोस्त’मधील त्याची भूमिका होती. त्याने चित्रपट तर स्वीकारला. आपली हुकमी नायिका हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हासोबत त्याने भरपूर सहकार्यही केले. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्याची आपले कुटुंबीय व काही मित्र यांच्यासह ट्रायल पाहताना धर्मेंद्रला वाटले आपला हा चित्रपट स्वीकारण्याचा निर्णय चुकला. चित्रपट अगदीच आदर्शवादी आहे आणि आपण आता मात्र (विशेषत: नोव्हेंबर 1973मध्ये रिलीज झालेल्या नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात’च्या हाऊसफुल्ल यशानंतर) आपल्याला अशा सोबर भूमिकेत रसिक स्वीकारतील काय? आणि चित्रपटही त्याला व त्याच्या कुटुंबियांना फारसा भावला नाही. म्हणून तो चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच कश्मीरला अन्य एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलादेखील. आता चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळात अनेक चित्रपट माऊथ पब्लिसिटीवर हळूहळू यशस्वी वाटचाल करीत. ’दोस्त’चेही तेच होत होते. एक दोन आठवड्यानंतर कश्मीरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो पाहिलेले काही चित्रपट शौकीन धर्मेंद्रला त्याच्या सेटवर भेटायला आले आणि ’दोस्त’ चित्रपट आवडला. हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे असे सांगताच धर्मेंद्र सुखावला, खुलला (तसा तो भावनाप्रधान, आहे). त्याने शूटिंगमधून वेळ काढून तिकडेच हाऊसफुल्ल गर्दीत ’दोस्त’ पाहताना तो पब्लिक रिस्पॉन्स पाहून अचंबित झाला. त्याने लगेचच दोन दिवसांची सुट्टी घेऊन मुंबईत येणे पसंत केले. मुंबईत येताच विमानतळावरुन तो थेट दुलाल गुहांच्या घरी गेला. दुलाल गुहाच्या मुलाने दरवाजा उघडताच त्याच्या लक्षात आले, धर्मेंद्र रात्रभर जागाच असावा. मुलाची भेट घेऊन धर्मेंद्र आत गेला. दुलाल गुहाच्या आईला भेटला. आपण चुकलो म्हणाला. तेवढ्यात दुलाल गुहा आल्यावर धर्मेंद्रने जवळपास त्याच्या पायावर लोटांगण घातले. माफी मागितली. आपल्या कुटुंबियांना चित्रपटातील काही कळत नाही म्हणाला. दुलाल गुहाने त्याची अवस्था पाहून त्याला भरपूर चहा नाश्ता दिला. धर्मेंद्रने तेथूनच आपला भाऊ अजितसिंग याला फोन करून पंजाबी भाषेत काही सांगितले.
(पूर्वी आपलं चुकले हे मान्य करणारे कलाकार होते. त्यांचे माणूसपण कायम होते.) अजितसिंग देवल याला पन्नास हजार रुपये घेऊन दुलाल गुहांच्या घरी आला. (पन्नास वर्षांपूर्वीचे पन्नास हजार म्हणजे आजचे किमान पन्नास लाख म्हणायला हवेत.) हे पैसे होते धर्मेंद्रच्या विजयता फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचा नवीन चित्रपट दुलाल गुहा दिग्दर्शित करणार याचे. तो चित्रपट होता ’प्रतिज्ञा’. अजितसिंग देवलकडे एक कथा कल्पना होती, नायकाची (धर्मेंद्र) आई त्याला मरण्यापूर्वी सांगते, तुझ्या पोलीस खात्यात असलेल्या वडिलांना तुझ्या अगदी लहानपणीच डाकूंनी मारले.
अतिशय झपाट्याने हा चित्रपट पूर्ण करीत 23 जून 1975 रोजी हा प्रदर्शित करताना ’दोस्त’चे मेन थिएटर गंगामध्येच हा चित्रपट प्रदर्शित केला.
’दोस्त’ची थीम काय? अनाथ मानवला (धर्मेंद्र) एका फादर फ्रान्सिस यांनी (अभी भट्टाचार्य) दत्तक (गोद) घेतलेय. ते त्याच्यावर ’चांगला माणूस म्हणून कसे असावे, जगावे याचे खोलवर संस्कार करतात.’ मानव शिक्षणासाठी शहरात येतो व शिक्षण पूर्ण झाल्यावर तो फादरना भेटायला गेल्यावर त्याला समजते त्यांचा मृत्यू झाला आहे. आता तो पुन्हा शहरात यायचा निर्णय घेतो. एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करीत असताना त्याची ओळख गोपीचंद (शत्रुघ्न सिन्हा) याच्याशी होते. गोपीचंदचा डोळा मानवच्या बॅगेवर असतो. त्यात भरपूर पैसा असेल असे गोपीचंदला मनोमन वाटते आणि तो ट्रेनचा वेग कमी होताच ती बॅग घेऊन पळतो. मानवला हा धक्काच असतो, तोही ट्रेनमधून उतरून गोपीचंदचा पाठलाग करून त्याला पकडतो. दोघांमध्ये झटापट होते. थोडे शांत झाल्यावर मानव त्याला सरळमार्गी, आदर्शवादी, प्रामाणिक, स्वच्छ आयुष्याचे महत्त्व समजावून सांगतो. यातून त्यांचे नवीन नाते निर्माण होते. मानव मुंबईत नोकरीच्या शोधात भरपूर फिरतो. त्यात त्याला बरेच बरे वाईट अनुभव येतात. अशातच त्याला गुप्ता (रेहमान) यांची मुलगी काजल (हेमा मालिनी) आवडते. पुढे काही घटना घडत घडत चित्रपट पुढे सरकतो. सचिन भौतिक यांची ही पटकथा आहे. चित्रपटातील गीत संगीत लोकप्रिय झाले. आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. गाडी बुला रही है (पार्श्वगायक किशोरकुमार) सर्वकालीन लोकप्रिय. कैसे जीते है भला (लता मंगेशकर, मोहम्मद रफी व शत्रुघ्न सिन्हा), आ बता दे के तुझे कैसे जीया जाता है (लता मंगेशकर व मोहम्मद रफी) या गाण्यांनी या आदर्शवादी चित्रपटातील रंजकता वाढली. चित्रपट त्यामुळेच चर्चेत राहिला आणि मग लोकप्रिय ठरला.
या चित्रपटापूर्वी निर्माते प्रेमजी यांनी ’मेरा साया’ (1966) व ’चिराग’ (1969) या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन राज खोसला यांचे आहे तसेच दुलाल गुहा दिग्दर्शित ’दुश्मन’ (1972) या चित्रपटांची निर्मिती केली. ते दिलीपकुमारचे सेक्रेटरी होते. ’दोस्त’नंतर रवि टंडन दिग्दर्शित ’मजबूर’ इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी ’धरती कहे पुकार के’ (1969), ’मेरे हमसफर’ (1970), ‘दुश्मन’ (1972) यानंतर ’दोस्त’चे दिग्दर्शन केले. त्यानंतर ’दो अन्जाने’ वगैरे चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
’दोस्त’ म्हणताक्षणीच गाडी बुला रही है, शिटी बजा रही है हा गाण्याचा मुखडा आठवणारच आणि मग ’चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है’ हे आयुष्याचे तत्वज्ञानही मनोमन पटणार. ते जास्त महत्त्वाचे…
– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply