माणगाव : प्रतिनिधी
महाड शहर परिसरासह तालुक्यात दि. 22 जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांतून आणि दुकानांमधून शिरून गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊन क्षणार्धात महाडमध्येे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या प्रसंगात महाडवासीयांच्या मदतीला माणगावकर मिळेल ती मदत घेऊन धावले.
याकामी लोकप्रतिनिधी, व्यापारी, प्रशासन, सामाजिक संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती यांच्याबरोबरच अनेक गावांनी घराघरांतून फिरून निधी गोळा करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक सर्वच प्रकारच्या वस्तूंची भरभरून मदत दिली. 22 जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्यांची सुटका होण्यासाठी पोलीस यंत्रणा व एनडीआरएफच्या टिमशी संपर्क साधण्यातही माणगावकर मागे पडले नाहीत. ज्याप्रमाणे महाडवासीयांनी ती रात्र जागून काढली त्याप्रमाणे आपला शेजारील तालुका संकटात आहे हे बघून माणगावकरांनी त्यांच्या मदतीकरिता रात्र जागून काढली.
पुराचे पाणी महाडमध्ये शिरल्यावर वीजपुरवठा खंडित होऊन सर्वांचेच मोबाईल बंद पडल्याने कोणालाच त्या ठिकाणी संपर्क साधता येते नव्हता. ती रात्रच महाडकरांसाठी वैर्याची होती. माणगावात रायगड पोलीस दलातर्फे माणगाव पोलीस ठाणे यांनी मदत केंद्र सुरू केले, तसेच तहसील कार्यालय माणगाव या ठिकाणी मदत स्वीकारण्यात येऊन ती महाड व तालुक्यातील पूरग्रस्तांना पोहचविण्यात येत आहे. माणगाव तालुक्यासह जिल्ह्यातून, तसेच जिल्ह्याबाहेरूनही महाड पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच आहे.