पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या विंधनविहीर पुनर्भरण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहेत. त्यामुळे विंधनविहिरी पावसाळ्यात रिचार्ज हाऊन उन्हाळ्यातील पाणी कमतरतेचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लागतांना दिसत आहे.
उन्हाळ्यात विंधनविहिरितील पाण्याचा उपसा अधिक वाढतो. त्यामुळे पाणी खोल जाते. काही वेळेस ते आटते. मग पुन्हा पाणी साठण्यास वेळ जातो. त्यासाठी जमिनीतील पाण्याचा साठा वाढवायला विंधनविहीर पूनर्भरण (रिचार्ज) पद्धतीसारख्या उपायोजना करणे गरजेचे आहे. यावर्षी सुधागड तालुक्यात सिद्धेश्वर गावाजवळील फार्महाऊसमध्ये, तर मागील वर्षी कुंभारघर येथील एका विंधनविहिरीला अशा प्रकारे पूनर्भरण पद्धत वापरण्यात आली. तर महागावलादेखील काही ठिकाणी ही उपाययोजना करण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्भरणा करण्यासाठी बहुतांश लोकांनी ही कमी खर्चीक व सोप्पी पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत अनेकांनी वापरली तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करता येईल.
सध्या बोअरवेलला पाणी कमी येत आहे. विंधनविहीर पुनर्भरण तज्ज्ञ अमित निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करून घेतली आहे. पाणी जिरवले तर ते आपल्याला मिळेल व ही पद्धत उपयोगी ठरेल.
-राजेश ठाकूर, ग्रामस्थ सिद्धेश्वर, ता. सुधागड
जमीनीतील पाणीसाठा वाढवायला विंधनविहीर पुनर्भरणसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पद्दतीमुळे बोअरवेल बरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील वाढते. अधिक लोकांनी ही पद्धत वापरावी व पाण्याचे संवर्धन करावे.
-अमित निंबाळकर, विंधनविहीर पुनर्भरण तज्ज्ञ, पाली, ता. सुधागड
विंधनविहीर पुनर्भरण पद्धत
सुरूवातीस विंधनविहिरीच्या बाजुला चार फुट खड्डा खणायचा. विंधनविहिरीच्या मोकळ्या पाईपला ड्रिल मशिनने होल मारून घेणे. त्यावर जाळी गुंडाळून नंतर त्यावर काथ्या गुंडाळावा. नंतर खड्ड्यात मोठे दगड त्यावर विटांचा चुरा त्यांनतर बारीक खडी त्यावर बारीक वाळू असे थर अंथरावे. खड्डा वरुन सहा इंच रिकामा ठेवावा. त्यामुळे पावसाचे पाणी गाळून जमिनीत जाईल व जलस्तर वाढेल. यात पावसाळ्यातील छप्पराचे पाणीसुध्दा गाळून सोडता येते. या सगळ्यासाठी अवघा 2-3 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे ही पद्धत कमी खर्चिक, अत्यंत सोप्पी आणि सहज करता येणारी आहे. यामुळे पाण्याचे झालेले पुनर्भरण कितीतरी अधिक फायदेशीर आहे.