पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने रिटघरमधील श्री भैरवदेव माध्यमिक विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती श्रीधर नाईक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर येथे झालेल्या 2019च्या अधिवेशनात शुक्रवारी (दि. 1) बृहन्मठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री ष. ब्र. धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या अंगी असलेले नेतृत्वगुण अचूक निर्णय घेण्याची क्षमता, सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांशी असलेली समर्पणाची भावना, शैक्षणिक क्षेत्रात कौशल्यात्मक व सकारात्मक घडवून आणलेले बदल, संस्थाचालक, शिक्षक व पालकांमध्ये समन्वय साधून राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन या महामंडळाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. सोमवारी (दि. 4) श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर येथे विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.