Breaking News

माथेरानमध्ये जोरदार वर्षावृष्टी

कर्जत : बातमीदार

जून महिन्याचे तीन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माथेरान जनजीवन विस्कळीत झाले आहे.

माथेरान हे उंच पर्वत शिखरावर घनदाट जंगलात वसलेलं पर्यटनस्थळ असून, दरवर्षी येथे 250 ते 300 इंच पाऊस पडतो. मात्र या वर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पावसाळ्याचा आनंद घेणार्‍या पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला होता. नागरिकही पाण्याच्या टंचाईला सामोरे जात होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने माथेरान परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यात नेरळ माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली. या पावसात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना झाल्या असल्याने  माथेरान नगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष सज्ज आहे.

शुक्रवारी (दि. 28) माथेरानमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. तो दिवसभर बरसत होता. त्यामुळे येथे कमालीचा गारवा निर्माण झाला होता. पर्यटक भर पावसात घोड्यावर फिरण्याचा आनंद घेत होते. मात्र सतत पाऊस पडत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. डोंगराच्या चोहूबाजूने लाल रंगाचे पाणी खाली कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे प्रवासादरम्यान पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागले. 28 ते 29 जूनमध्ये 340 मिली पाऊस झाला आहे.

माथेरानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे सज्ज आहे. झाडे पडण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती आहे तिथेसुद्धा आमचे  कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. घाट रस्त्यात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगून प्रवास करावा.

-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply