नॅशनल हेराल्डसंबंधी कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू आहे. गेले सलग तीन दिवस त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून तब्बल तीस तास प्रश्नोत्तरे करण्यात आली. ईडीच्या तपास अधिकार्यांच्या प्रश्नांना राहुल गांधी उत्तरे देत होते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्याचा मार्ग पत्करला. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी अशी निदर्शने करण्यात आली आहेत. आपल्या नेत्याला तपास अधिकार्यांनी चौकशीसाठी देखील बोलावता कामा नये ही काँग्रेसी मानसिकता समजून घेण्याच्या पलीकडची आहे.
तीन दिवस सलग चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या विनंतीनुसार त्यांना एक दिवसाची विश्रांती ईडीने गुरूवारी दिली खरी, परंतु चौकशीचे हे सत्र आणखी बराच काळ लांबेल असे दिसते. ही चौकशी आणखी लांबली तर काँग्रेसचे आंदोलनजीवी कार्यकर्ते रस्त्यातच मुक्काम करणार आहेत का हा प्रश्नच आहे. नॅशनल हेराल्डचे प्रकरण तसे काही वर्षांपासून गाजते आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ते प्रारंभी लावून धरले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी तसेच मल्लिकार्जुन खड़गे व स्व. मोतीलाल व्होरा यांची नावे या कथित घोटाळा प्रकरणी गुंतलेली आहेत. ईडीच्या तपासात आणि तदनंतर न्यायालयात या प्रकरणाचा जो काही फैसला व्हायचा आहे तो होईल. कर नाही त्याला डर कशाला? वास्तविक मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप झाल्यानंतर गांधी परिवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संयम दाखवायला हवा होता. हे सगळे प्रकरणच मुळात बोगस असल्याचा दावा काँग्रेस नेते करतात. जर ते तसे असेल तर ईडीच्या तपासाबाबत एवढा गहजब कशाला? राहुल गांधी यांना ईडीने विश्रांती दिली असली तरी ठिकठिकाणी आंदोलने करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र आराम करण्याची परवानगी नव्हती. सलग चौथ्या दिवशी दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसतर्फे मोर्चे काढण्यात आले. अर्थात त्यास प्रतिसाद तुरळक होता हा भाग अलाहिदा. ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर रस्यात ट्रकचे जुने टायर जाळून मोदी सरकारचा निषेध केला. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोपही करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या या आंदोलनांशी जनतेचा मात्र काडीमात्र संबंध नाही. तरीही असल्या निरर्थक आंदोलनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना त्रास होतच असतो. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शांततेचे आवाहन करून आपल्या कार्यकर्त्यांना रोखले असते तर बरे झाले असते. परंतु काँग्रेस आणि गांधी परिवार या दोहोंनाही असुरक्षिततेच्या भावनेने घेरले आहे. ईडीच्या प्रश्नोत्तराच्या फैरी चालू असतानाच अचानक अटकेची कारवाई झाली तर काय करायचे या विचाराने सध्या काँग्रेस नेत्यांचे चेहरे काळवंडले आहेत. जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडण्याऐवजी काँग्रेससारखा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष स्वत:च्या नेत्यांना वाचवू पाहण्यासाठी धडपडतो आहे यातच त्या पक्षाची विदारक अवस्था स्पष्ट होते. सामान्य जनतेचे अनेक प्रश्न खरे तर हा पक्ष मांडू शकतो. परंतु त्यांची पर्वा काँग्रेसने करण्याचे काही कारणच नाही. या पक्षाचे वर्तन असेच चालू राहिले तर आपली उरलीसुरली विश्वासार्हताही काँग्रेस गमावून बसेल.