नवी मुंबई : बातमीदार
कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे पाहिले ते दहावी या विषयाचे पीडीएफ फाईल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्मार्ट फोनवर देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला शिक्षण देण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून आर्थिक दुर्बल घटक व झोपडपट्टीमध्ये राहणार्यांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे अनेकांकडे स्मार्ट फोन असेलच असे नाही आणि असल्यास ग्रामीण भागात नेटवर्कचा देखील अभाव असण्याची शक्यता असल्याने शिक्षणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शासनाच्या दूरचित्रवाणीवर जर विद्यार्थ्यांचा अभ्यास प्रसारित केला तर तळागाळातील सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच डळमळीत झालेल्या दूरदर्शन चॅनेलला अच्छे दिन येतील. दुरदर्शनची होत असलेली वाताहत थांबवता येईल. लॉकडाऊन नंतर होणारे रोजगाराचे प्रश्न निर्माण होणार असून निदान दूरदर्शन कर्मचार्यांच्या नोकर्या शाबूत राहतील. राज्य शासनाने याचा उपयोग करावा अशी मागणी भाजपचे ठाणे, पालघर जिल्हा सरचिटणीस संजय पवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून केली आहे.