गेले अनेक वर्षे प्रश्न जैसे थे
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील स्थानिक मूर्तिकार मागील कित्येक वर्षांपासून मूर्ती घडवण्यासाठी तसेच मूर्ती विक्रीसाठी प्रशासनाकडे कायमस्वरूपी वा तात्पुरती स्वरूपात जागा मागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र शहरात बाहेरून येणारे धंदेवाईक व्यापारी बेकायदेशीर रित्या मूर्ती विक्री करत असतात अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी शाडो मुर्ती साठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी आदी प्रश्नावर नवी मुंबईतील मूर्तिकार नवी मुंबई मनपा आयुक्त यांची सोमवारी भेट घेणार आहेत.
गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. नवी मुंबई शहरातील स्थानिक मूर्तिकार यांनी घडविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र सध्या शहरातल्या स्थानिक मूर्तिकारांची जागे अभावी कुचंबना होत आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा जागेचा प्रश्न आजही जैसे थे आहे. नवी मुंबईतील गणेश मुर्तीकाराना दरवर्षी जागेचा शोध घ्यावा लागतो ,जागेअभावी अनेकांना आपल्या परंपरेनुसार चालत आलेली कला जिवंत ठेवण्यासाठी जादा भाडे देऊन तीन- चार महिन्यांनासाठी जागा भाडेतत्वावर घ्यावी लागते .याबाबत नवी मुंबई गणपती मूर्तिकार संस्थेच्या वतीने सिडको व पालिका प्रशासना कडे वारंवार पाठपुरावा करून ही त्यांना अल्प भाड्यात जागा उपलब्ध होत नाही. आजमितीला शहरात शंभराहून अधिक मूर्तिकार मूर्ती घडवत आपली पूर्वापार चालत आलेली कला जोपासत आहेत. मात्र मुख्य समस्या या कलाकारांना जागेची असल्याने दरवर्षी त्यांना मुर्त्या घडविण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागतो. यावर्षी देखील अशीच परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहिली आहे. सिडकोकडून कलाकारांसाठी आर्टिस्ट व्हिलेज,अर्बन हार्ट सारख्या वास्तूंची निर्मिती केली आहे,पण मूर्तिकारांसाठी जागा उपलब्ध करत नसल्याची नाराजी मूर्तिकारांन कडून व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात कुठे तरी अडगळीच्या ठिकाणी जागा उपलब्ध होते खरी , मात्र त्या जागेचे भाडे देखील भरमसाठ असल्याने नाईलाजास्तव ते भाडे मूर्तिकारणा द्यावे लागते . ,दिवाळी किंवा इतर महोत्सवासाठी पालिका व सिडको ज्याप्रमाणे संबंधित याना जागा भाडेतत्वावर देते त्याच पद्धतीने आम्हाला ही किमान चार महिन्यांसाठी जागा उपलब्ध करावी अशी मागणी मूर्तिकार संस्थे कडून केली जात आहे. जागेअभावी अनेक मूर्तिकारानी सार्वजनिक मंडळातील मुर्त्या घडविणे बंद केले असून ते फक्त घरगुतीच मुर्त्या बनवत आहेत. स्वतन्त्र भूखंड विकत घेणे मूर्तिकाराच्या आवाक्याबाहेर आहे,मात्र ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांना आपली हाताची कला जिवंत ठेवावी लागत आहे . त्यातच शहराबाहेरील पेण, अमरापूर, जोहे, कळवा आदी ठिकाणी असणार्या धंदेवाईक व्यापार्यांचे नवी मुंबईतील मूर्तीच्या बाजारपेठ मध्ये आक्रमक होत असते .हे व्यापारी बेकायदा मूर्ती विक्री करत असून स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत असते? असा प्रश्न स्थानिक मूर्तिकार करत आहेत. नवी मुंबईतील जागा व अन्य समस्या संदर्भात आयुक्त अभिजित बांगर यांची येत्या सोमवारी भेट घेणार असल्याचे नवी मुंबई मूर्तिकार संस्थेचे अध्यक्ष संतोष चौलकर यांनी सांगितले.
जागेसाठी दरवर्षी भटकंती
स्थनिक मूर्तिकार शाडो मूर्ती बनवण्यासाठी प्राधान्य देत असतात. मात्र आपली कला जोपासण्याचा अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या चार दशकां पासून दिघा ते बेलापूर पर्यंत मूर्ती घडविण्याची काहींना विक्री साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना हक्काची अशी जागा मिळत नसल्याने दरवर्षीप्रमाणे त्यांना जागेसाठी भटकंती करावी लागते. कोपरखैरणे येथील मूर्तिकार तथा नवी मुंबई गणपती मूर्तिकार संस्थेचे अध्यक्ष संतोष चौलकर हे गेली अनेक वर्षे सिडको व पालिके कडे भाडेतत्वावर जागा उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत,मात्र प्रशासना कडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने सांगितले.