Breaking News

उरणची वाटचाल दुसर्‍या आर्थिक राजधानीकडे

वाढत्या उद्योगांमुळे परिसरात विकासाची गंगा

उरण : प्रतिनिधी

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतर  उरण परिसरात जेएनपीएसारखे अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या बंदराची उभारणी झाली. बंदरातून प्रचंड प्रमाणात होणार्‍या आयात-निर्यात व्यापारामुळे उरण परिसरात विकासाची गंगा वाहू लागली.जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस, नौदल शस्त्रागार, जेएनपीए सेझ आणि इतर प्रकल्पावर आधारित मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या उद्योगांमुळे वर्षांकाठी सुमारे 80 हजार कोटींपर्यत आर्थिक उलाढाल वाढली आहे. उरणचा झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या उद्योगांमुळे उरणची वाटचाल सध्या तरी दुसर्‍या आर्थिक राजधानीकडे होऊ लागली आहे.

भात आणि मीठाचे कोठार म्हणून असलेली उरणची ओळख आता पुसट होऊ लागली आहे. याला उरणचे प्रचंड गतीने होणारे औद्योगिकीकरण कारणीभुत ठरू लागले आहे. जेएनपीए बंदराच्या उभारणीनंतर मागील काही वर्षात आयात-निर्यातीच्या व्यापार चांगलाच फोफावत चालला आहे.

जेएनपीए आणि अन्य तीन खासगी बंदरातून वर्षांला 50 लाख कंटेनर मालाची आयात-निर्यात केली जाते. आता नव्याने देशातील सर्वांत मोठ्या आणि 50 लाख कंटेनर हाताळणी क्षमतेचे आठ हजार कोटी खर्चाचे चौथे बंदर उभारण्यात आले आहे. या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

खासगी कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेले करंजा कंटेनर बंदर सुरू झाले आहे. करंजा-रेवस मार्गावर रो-रो सेवा सुरू होणार आहे. जागतिक एलिफंटा बेटावरही 24 तास वीज उपलब्ध झाली आहे. यामुळे पर्यायाने पर्यटन उद्योगाला चालना मिळाली आहे. उरणचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढत्या उद्योगांमुळे उरणची वाटचाल सध्या तरी मोठ्या आर्थिक प्रगतीकडे होऊ लागली आहे.

अत्याधुनिक मच्छीमार बंदर

राज्यातील सर्वांत मोठे एक हजार बोटी क्षमतेचे करंजा येथे 150 कोटी खर्चून अत्याधुनिक मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. या बंदरामुळे सुमारे 25 हजार रोजगार उपलब्ध होण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या करंजा बंदरामुळे उरणच्याच नव्हे तर रायगडमधील हजारो मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीच्या मार्गाला मोठा हातभार लागणार आहे.

रस्ते रुंदीकरणाची कामे प्रगतिपथावर

जेएनपीएने तीन हजार कोटीची सहा आणि आठ पदरी रस्ते रुंदीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सात फ्लायओव्हरचाही समावेश आहे. मोठ्या क्षमतेची जहाजे लागण्यासाठी समुद्र चॅनेलची खोली 15.80 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकतेच या बंदरात 13 हजार कंटेनर भरलेले महाकाय मालवाहू जहाज दाखल झाले होते.

उरण रेल्वे मार्गाचे काम सुरू

सिडको आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेला नेरूळ-उरण रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. सुमारे 1783 हजार कोटींचा हा रेल्वे मार्ग खारकोपर या पहिल्या टप्प्यापर्यंत कार्यान्वीत झाला आहे. उरणपर्यंत हा रेल्वेमार्ग येत्या सप्टेंबर 2022 पुर्णत्वास जाईल, अशी घोषणा मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केली आहे.

प्रकल्पांमुळे जमिनीला चांगला भाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला असून विमान उड्डाणाची घडी दृष्टीपथावर येऊन ठेपली आहे. गोवा, पुणे, कोकण महामार्गाशी जोडणारा अतिशय महत्वाचा शिवडी-न्हावा सीलिंक पुलाचे कामही 75 टक्के झाले आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे उरण परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply