नवी मुंबईतील मैदानात कचरा
नवी मुंबई : बातमीदार
राज्य शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबई पालिकेकडून प्लास्टिक व थर्मकोलवर बंदी लादली गेली आहे. त्यानुसार पालिकेकडून अनेकदा कारवाया केल्या गेल्या आहेत. थर्माकोलवर बंदी लादलेली असताना नागरिकांकडून गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात इको-फ्रेंडली देखावा करीत त्यास साथ दिली जात आहे, मात्र दुसरीकडे काही डेकोरेटर्सकडून बेसुमार थर्माकोलचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. नेरूळ येथील तांडेल मैदानात हे चित्र पाहण्यास मिळत असून डेकोरेटर्सने सेट काढून 15 ते 20 दिवस उलटले तरीही अद्याप हा थर्माकोल मैदानावर पडलेला दिसत आहे.
सिवूड येथील तांडेल मैदानाचे दोन भाग पालिकेने बनवले आहेत. यात एक भाग स्थानिकांना क्रिकेट खेळण्यास मध्ये तारांचे कुंपण टाकून दुसरा भाग वेगळा केला आहे. या भागात तारांभोवती मियावाकी अंतर्गत साडेचार हजार झाडे लावली आहेत. हा भाग लग्न समारंभ तसेच विविध संस्कृतिक कार्यक्रमांसाठी दिला जातो. यात मोठमोठे लग्नसोहळे होत असतात. साधारण 20 दिवसांपूर्वी या भागात मोठा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात भले मोठे सेट डेकोरेटर्सने उभारले होते. लग्नसोहळा उरकल्यावर जवळपास आठवडाभर डेकोरेटर्सकडून सेट काढून घेण्याची व सामान आवराआवरी सुरू होती. सर्व सामान आवरून झाल्यावर डेकोरेटर्सकडून सेटमधील महत्त्वाचे भाग काढून उर्वरित नको असलेले अनेक भाग या मैदानात टाकल्याचे आढळून आले आहेत. यात मोठमोठे थर्माकोलचे ठोकळे असून डेकोरेटर्सकडून बेसुमार थर्मकोलचा वापर केला गेल्याचे आढळून आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणार्या डेकोरेटर्सना दंड ठोठवणे गरजेचे आहे; अन्यथा यापुढेदेखील थर्माकोलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी वाढू लागली आहे.
पालिकेकडून कारवाईची मागणी
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात महापालिकेकडून दुकानांवर कारवाई करण्यात येते. दंड ठोठाविण्यात येतो, मात्र डेकोरेटर्सकडून खुलेआम थर्माकोलचा वापर केला जात असतानाही विभाग अधिकार्यांकडून कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. 15 ते 20 दिवस उलटून गेल्यावरदेखील मैदानात थर्माकोल पडून असून अस्वच्छता पसरलेली आहे. या संदर्भात कारवाईची मागणी होत आहे. मियावाकी प्रकल्पाला हानी पोहचण्याची शक्यता लग्न समारंभात डेकोरेटर्सकडून सेट व पडदे उभारताना मियावाकी रोपामध्ये लोखंडी व लाकडी खांब उभे केले जात आहेत. त्यामुळे मियवाकी प्रकल्पात वाढणार्या रोपांना हानी पोहचण्याची शक्यता आहे.