मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड किनार्यावर पाच फूट लांब व 60 किलो वजनाचा मृत डॉल्फिन वाहून आल्याने मुरूडच्या प्राणिमित्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनार्यावर डॉल्फिन उड्या मारताना पाहायला मिळत असल्याने भारतातून अनेक पर्यटक कोकणात येतात. नुकतेच आगरदांडा परिसरातील किनारपट्टीवर डॉल्फिन उड्या मारताना पाहिले गेले. लाटांमधून पाणी उडवत 10 फूट उंच उडी मारणार्या डॉल्फिनच्या मृत्यूचे खरे कारण शोधणे गरजेचे असल्याचे मत प्राणिमित्रांनी व्यक्त केले आहे. मुरूड परिसरातील दिघी प्रकल्पासाठी वस्तूंची ने-आण करण्यासाठी मोठी जहाजे रोज येत असतात. या जहाजांचे महाकाय पंखे समुद्रात चालतात, त्यावेळी डॉल्फिन व इतर मासे त्यात अडकून मृत्युमुखी पडत असावेत. कारण मुरूड किनार्यावर दरवर्षी सहा ते सात डॉल्फिन वाहून येतात.