शेतकरी चिंताग्रस्त
उरण : प्रतिनिधी, बातमीदार
पेरणीचा पाऊस उत्तम झाल्याने उरणच्या पूर्व भाग परिसरातील खाडी विभागातील भातशेतीत दमदार झालेली भाताची रोपे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शेतात तुंबल्याने पार कुजून गेली आहेत. भाताची रोपेच कूजन गेल्याने आता भाताची लागवट कशी करायची, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
उरणच्या पूर्वभाग परिसरातील आवरे, वशेणी, कळंबुसरे, चिरनेर, मोठीजुई, बोरखार, कोप्रोली, पिरकोन, खोपटे, सारडे वशेणी या विभागात खारशेतीचे प्रमाण जास्त आहे. पहिला पाऊस पडला की हे शेतकरी खाडी विभागातील भात शेतामध्ये ठिकठिकाणी छोटे छोटे गादीवाफे करून त्यावर भातबियाणांची पेरणी करतात. तद्नंतर दमदार झालेली भाताची रोपे आवटणी पद्धतीने पूर्ण शेतभर टाकून त्याची लावणी केली जाते, मात्र यावर्षी भाताची रोपे लावणी योग्य झाली असतानाच गेल्या आठ दिवसापासून पडणार्या मुसळधार पावसाचे पाणी या खाडी विभागातील भातशेतीत तुंबून राहिले. परिणामतः ही भाताची रोपे पार कुजून गेली आहेत.
तुंबलेल्या पाण्यामुळे शेकडो एकर शेती बाधित झाली आहे. भात रोपांचा झालेला चिखल व शेतात पाणी असल्याने दुबार पेरणी शक्य नसल्याने यावर्षी ही भातशेती ओसाड जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बाधित शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे.
या कुजलेल्या भातशेतीचे रीतसर पंचनामे करून कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय द्या, अशी मागणी जाणकार शेतकरी भालचंद्र पाटील यांनी केली आहे.