विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताचा डंका
अबुधाबी : वृत्तसंस्था
गोव्यातील सबिता यादव हिने विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक; तर दुहेरीत रौप्यपदक जिंकत देशाला दोन पदके मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.
17 वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच व्यवस्थित बोलताही येत नाही. सबिताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून, तिची आई घरकाम करते. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या आपल्या कुटुंबासाठी सबिताला काहीतरी करून दाखवायचे आहे.
सबिताने एका विशेष विद्यालयात प्रवेश मिळवला आहे. तेथे तिला व्यायसायिक प्रक्षिक्षण दिले जाते. तिथे मुलांना शिवणकाम आणि पाककलेबरोबर इतरही अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते, मात्र तिची रुची टेबल टेनिसमध्ये आहे. बॅडमिंटनपेक्षा आपल्याला टेबल टेनिसमध्ये अधिक गती आहे, हे सबिताच्या सन 2015मध्ये लक्षात आले. त्यानुसार तिने मेहनत घेतली आणि जागतिक स्तरावर भारताला दोन पदके मिळवून दिली.
विशेष ऑलिम्पिक खेळांमधील खेळाडूंनाही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्तर पार केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते, हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे, पण सबितामध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याचा आत्मविश्वास आहे. त्यामुळेच तिने हे करून दाखवले, असे तिच्या टेबल टेनिस प्रशिक्षक शीतल नेगी म्हणाल्या.
दरम्यान, या स्पर्धेत सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या नावावर 163 पदके आहेत. यामध्ये 44 सुवर्ण, 52 रौप्य आणि 67 कांस्यपदकांचा समावेश आहे; तर चीन दुसर्या क्रमांकावर आहे.