प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
1957 साली झालेल्या निवडणुकीत दि. बा. पाटील प्रथम जरी निवडून आले असले तरी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सार्या विधानसभेचे लक्ष वेधून घेतले होते. जनतेचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
स्वातंत्र्यपूर्व काळात कुलाबा जिल्ह्यात कष्टकरी, शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ना. ना. ऊर्फ अप्पासाहेब पाटील, नानासाहेब टिपणीस, अनंतराव तथा भाई चित्रे यांनी खोती आणि सावकारांच्या मदोन्मत्त सत्तेविरोधात शेतकर्यांची मोठी चळवळ उभारली. चरी, भेंडखळ गावात शेतकर्यांनी जमीनदाराच्या विरोधात संप पुकारले. या सर्व परिस्थितीची दि. बा. पाटील यांना जाणीव असल्यामुळे सरकारने जेव्हा विधानसभेत कुळ कायद्याचे विधेयक आणले तेव्हा त्यांनी या विधेयकावर तब्बल साडेचार तास अभ्यासपूर्ण भाषण करून विधेयकातील अनेक त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणल्या व विविध दुरुस्त्या सूचवून या कुळ कायद्याचे विधेयक मंजूर करण्यास भाग पाडले. तो दिवस होता 1 एप्रिल 1957. शेतकर्यांच्या, जमीन कसणार्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर दि. बा. असे तुटून पडत. त्यामुळे विरोधी पक्षाचे आमदारही त्यांच्याकडे आशेने पाहत. आमदारकीची पहिली टर्म ‘दिबां’नी अशी लक्षवेधी केली.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तरी बेळगाव, कारवार सीमाप्रश्नामुळे तणाव होता. काँग्रेस पक्ष आपल्या परीने ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील होता. अशात 1962 साली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. पनवेल मतदारसंघातून शेकापने दि. बा. पाटील यांना दुसर्यांदा उमेदवारी दिली. ‘दिबां’ची कार्यकक्षा पनवेल, उरण तालुक्यापुरती मर्यादित न राहता त्यांचा नावलौकिक महाराष्ट्रभर पसरला होता. काँग्रेस पक्षाने पनवेल मतदारसंघातून प्रतापसिंह चव्हाण यांना उमेदवारी दिली. तेही जोरात कामाला लागले होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना शब्द दिला होता की, आम्ही महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचीच सत्ता आणू. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सर्व प्रकारे तयारीही केली. प्रदेश काँग्रेस कमिटीत मोठे बदल करून राजारामबापू पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. बापूंनी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय पुण्याहून मुंबईला टिळक भवनात आणले. या सर्वांचा परिणाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यात झाला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात काँग्रेसला बर्यापैकी वातावरण निर्माण झाले, पण कोकणपट्टीत त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
कुलाबा जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जोरात होते. दि. बा. पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. पदरमोड करून गावागावात प्रचाराची राळ उडवून देत होते. या निवडणुकीत दि. बा. पाटील यांची निशाणी खटारा होती. शेतकर्यांना, कष्टकरी जनतेला ती आपली वाटायची. काँग्रेसही आपल्या पक्षाच्या निशाणीचा प्रचार करीत होती. त्यामुळे पनवेलची ही निवडणूक रंगतदार बनली होती.
अखेर या निवडणुकीत दि. बा. पाटील यांनी बाजी मारली. त्यांना 18,856 मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापसिंह चव्हाण यांना 13,772 मतांवर समाधान मानावे लागले. ‘दिबा’ 5084 मतांनी विजयी झाले. हा विजय पनवेल, उरणकरांनी म़ोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा केला.
- दीपक रा. म्हात्रे , ज्येष्ठ पत्रकार
RamPrahar – The Panvel Daily Paper