पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल मधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचल्याने पाण्यातून वाहन चालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत.
गाढी नदीच्या काठावर 10 करोडपेक्षा जास्त रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. यामध्ये सिमेंटचे चार ब्लॉक तयार करून बसवण्यात आले आहेत. पावसातच या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पाणी साचत असून वाहन चालकांना त्रास होत आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची ऊंची ही आतील सीमेंट ब्लॉक पेक्षा जास्त असल्याने आत साठलेले पाणी तसेच राहत आहे. याशिवाय त्याठिकाणी वाहून येणारी माती नदीच्या पात्रात न जाता तेथील दुभाजका जवळील जाळीला अडकून राहून गटार मातीने भरून जाते. त्यामुळे वरुन येणारे पाणी नवीन पनवेलकडे येण्याचा मार्ग असलेल्या ब्लॉक मध्ये जाते तेथून पाण्याचा निचरा होण्यासाठी दूसरा मार्ग नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून गाडी न्यावी लागत आहे. आत मध्ये शेवाळ झाल्याने दुचाकी वाहने घसरत आहेत. त्यातच रात्रीच्या वेळेस या मार्गात विजेची सुविधा नाही, त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी याबाबत सिडको अधिकार्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर सिडकोच्या अधिकार्यानी गटार साफ केले होते. पण सध्या पुन्हा तिच अवस्था आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे, का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आम्ही भुयारी मार्ग बांधून दिल्यानंतर त्याचा ताबा सिडकोला दिला असल्याने त्याची जबाबदारी सिडकोची आहे, तरी पण मी जाऊन तांत्रिक अडचण काय आहे त्याची पाहणी करीन.
-पाईकराव, सीनियर सेक्शनल इंजिनियर, रेल्वे
भुयारी मार्गाच्या गटारात बसवलेली जाळी फिक्स आहे. ती जर काढण्याची सोय असती, तर गटारा साफ करणे सोयीचे झाले असते. आम्ही दोनदा हाताने साफ करून घेतले, पण आठ दिवसात पुन्हा भरते रेल्वेने ती जाळी काढता येणारी बसवल्यास हा प्रश्न सुटेल.
-संतोष साळी, एईई, सिडको