Breaking News

सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित

कर्जत ः प्रतिनिधी

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी पोह्यासाठी ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात

’बोटवेल’ या स्थानिक जातीपासून उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे.

’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात कमी उंचीची (बुटकी), न लोळणारी, 125-130 दिवसांत तयार होणारी (निमगरवी), आखूड-जाड दाण्याची, खोडकिडा व कडा करपा या रोगास मध्यम प्रतिकारक आहे. महाराष्ट्र राज्य चाचणी प्रयोगांमध्ये या वाणाचे तुल्यवान बोटवेलपेक्षा 22.5 टक्के व शेतकर्‍यांच्या शेतावर 16.22 टक्के अधिक उत्पादन मिळाले आहे. सरासरी 38 ते 40 क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन देणारे हे वाण असून सुगंधी पोह्यासाठी उत्तम आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतचे हे शताब्दी महोत्सवी वर्ष असल्याने या भात वाणाला ’कर्जत शताब्दी’ असे नाव देण्यात आले आहे. कर्जत संशोधन केंद्राने सन 1919पासून आतापर्यंत एकूण 27 भात जाती विकसित केल्या आहेत. या नवीन वाणामुळे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

’कर्जत शताब्दी’ हे भात वाण भात पैदासकार डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक विकसित केले आहे. त्यांना कनिष्ठ भात पैदासकार एम. पी. गवई व कनिष्ठ शरीरक्रिया शास्त्रज्ञ एम. एच. केळूस्कर यांनी सहकार्य केले.

सदर संशोधनास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. एम. हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. जी. भावे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एम. बुरोंडकर, वनस्पतीशास्त्र विभाग, माजी विभाग प्रमुख डॉ. ए. के. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या संयुक्त संशोधन समितीच्या बैठकीत ’कर्जत शताब्दी’ जातीला मान्यता देण्यात आली. शास्त्रज्ञांच्या या स्पृहणीय यशाबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी अभिनंदन केल्याचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कळविले आहे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply