Breaking News

भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे

डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त,  गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड,  वयस्कर लोकांसाठी पेन्शन योजना, विधवा निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ, शंभर टक्के लसीकरण झालेले गाव. एखाद्या गावाने असे वर्णन केले तर कदाचीत हे स्वप्नातील गावाचे वर्णन वाटेल. परंतु खरेच असे एक गाव आहे. भावशेत ठाकूरवाडी हे या गावाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात हे गाव आहे. लोकसहभाग, सामाजिक संस्थांचा हातभार या माध्यमातून समृध्दीकडे वाटचाल केली आहे. या गावाने केलेल्या प्रगतीमुळे भावशेत ठाकूरवाडी हे गाव नुकतेच स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. गावकर्‍यांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.

पाली तालुक्यातील डोंगरमाथ्याच्या कुशीत वसलेले भावशेत ठाकूरवाडी हे दुर्गम गाव. काही वर्षांपूर्वी भौगोलिक परिस्थितीमुळे काहीसे दुर्लक्षित आणि मागासलेले गाव होते. हे आदिवासीचे एक गाव आहेे. आदिवासी समाजातील   96 कुटूंबांचे साडेतीनशे ते चारशे लोकवस्तीचे हे गाव आहे. आदिवासी समाजाची वस्ती असूनही गेल्या तीन वर्षात गावाने केलेली वाटचाल थक्क करणारी आहे. या गावातील लोकाची इच्छाशक्ती. त्यांना मिळालेली स्वदेश फाउंडेशनची साथ. स्वदेशच्या कार्यकर्त्यांचे वेळोवळी मार्गदर्शन यामुळेच हे गाव प्रगती करत आहे.

2018मध्ये स्वदेश या सामाजिक संस्थेने या दुर्गम गावाचा सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय घेतला. दुर्गम  गाव आणि आदिवासी समाज, अशा ठिकाणी काम करणे सोपे नाही. काम करताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यांना आपले विचार समजावून सांगून त्यांच्याकडून काम करून घेणे एक आव्हानच असते आणि आव्हान स्वदेशने उचलले. लोकसहभाग असल्याशिवाय हा विकास शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गावातील काही सुशिक्षित तरुणांना एकत्र करून स्वदेशने गावात ग्राम विकास संस्थेची स्थापना केली. गावातील तरुणांकडेच गावाचा विकास करण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी आवश्यक संसाधने, प्रशिक्षण, आर्थिक मदत संस्थेने देण्याचे मान्य केले. स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, साक्षर आणि स्वावलंबी गाव बनविण्याच्या दृष्टीने गावाची वाटचाल सुरु झाली. सुरुवातीला शासनाच्या विविध योजना गावात शंभर टक्के राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील सर्व नागरिकांची आधार कार्ड काढणे, रेशन कार्ड, बँक खाती काढण्यात आली. उत्पन्न दाखले, जातीचे दाखले काढण्यात आले. यानंतर पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड काढण्यात आली. त्यानंतर वयस्कर लोकांसाठी पेन्शन योजना, विधवा निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. गावातील प्रत्येकाला आरोग्य विमा योजना लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

दुसर्‍या टप्प्यात गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. घरकूल योजनेंतर्गत पक्की घरांची बांधकामे सुरु करण्यात आली. गावातील पाणीप्रश्न सुटावा यासाठी स्वत:ची पाणीपुरवठा योजना विकसित करण्यात आली. त्यासाठी सहा किलोमिटर दूरवर असलेल्या पाण्याच्या स्त्रोतातून जलवाहिनी टाकून पाणी आणले. गावात टाकी बांधण्यात आली. पूर्वी या गावातील महिलांना तीन किलोमिटर जाऊन पाणी आणावे लागत होते. आता प्रत्येक घराला नळ जोडणी देऊन थेट घराघरात पाणी पोहोचवण्यात आले आहे. सांडपाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून घराघरात शोषखड्डे, शौचालयांची उभारणी केली. गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त झाले आहे.

गावातील लोकांनी रोजगार हमी योजनेतून या शोषखड्ड्यांचे बांधकाम केले. त्यामुळे गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. या गावातील लोक पूर्वी बिगारीकाम  करत असत. आता हेच लोक गवंडी काम  करतात. गावात घर बांधण्यासाठी दुसरीकडून गवंडी आणावा लागत नाही.  शाळा, अंगणवाडी, ग्रंथालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या. सोलर यंत्रणा बसवून या इमारती स्वयंप्रकाशित करण्यात आल्या. डिजीटल शाळाही कार्यान्वयीत झाली.  शेतीला कुक्कुटपालन, शेळीपालन, म्हैस पालनाची जोड दिली. यामुळे कुटूंबाच्या उत्पन्नात भर पडली. त्यामुळे स्थलांतरण रोखण्यास मदत झाली. गावातील घरांना एकाच रंगसंगतीने रंगविण्यात आले. गेल्या तीन वर्षात गावात एक कोटींहून अधिक रुपयांची कामे करण्यात आली.63 प्रकारच्या कामे गावकर्‍यांनी लोकसहभागातून केली. त्यामुळे विकासाला शाश्वत स्वरूप प्राप्त झाले. लोकसहभागामुळे गावात समृद्धी आली आहे. या गावाला स्वप्नातील गाव म्हणून घोषीत करण्यात आले आहे. गावकरी एकत्र आले. काम करण्याची इच्छा दाखविली, गावातीलच नेतृत्त्व तयार करण्यात आले. त्यांनी शासनदरबारी पाठपूरावा केला. त्यांना स्वदेश फाउंडेशनचे सहकार्य मिळाले.  काम मंजूर करून घेण्यासाठी कुठे जायाला हवे त्याचे मार्गदर्शन केले. जी कामे शासनाच्या योजनामध्ये बसू शकत नव्हती तिथे स्वदेश व इतर संस्थांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे हे शक्य होऊ शकले. लोकसहभाग, शासनाची मदत, स्वयंसेवी संस्थांची साथ यामुळे गावाचा कसा विकास करता येतो याचा आदर्श भावशेत ठाकूरवाडीने घालून दिला आहे.

थक्क करणारी विकासाची वाटचाल

एखाद्या गावाला खरे गावपण येते ते तेथील विविध सुविधांमुळे. शासकीय विविध योजना येत असतात. त्याचा लाभ तेथील नागरिकांना मिळाला तर लोकांचा विकास आणि पर्यायाने गावाचा विकास होतो. तसेच शासनाबरोबरच तेथील लोकांचा आणि विविध सामाजिक संस्था यांचा सहभाग असेल तर गावाची विकासाची वाटचाल चक्क करणारी असते. पाली तालुक्यातील डोंगरमाथ्याच्या कुशीत वसलेले भावशेत ठाकूरवाडी हे खरेतर दुर्गम गाव. काही वर्षांपूर्वी भौगोलिक परिस्थितीमुळे काहीसे दुर्लक्षित आणि मागासलेले गाव होते. हे आदिवासींचे एक गाव आहेे. आदिवासी  समाजातील 96 कुटूंबांचे साडेतीनशे ते चारशे लोकवस्तीचे हे गाव आहे. आदिवासी समाजाची वस्ती असूनही गेल्या तीन वर्षात गावाने केलेली वाटचाल निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या गावातील लोकांची इच्छाशक्ती, त्यांना मिळालेली स्वदेश फाउंडेशनची साथ आणि मार्गदर्शन यामुळेच हे गाव आज अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply