नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाउंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 19 ऐरोली येथील नेवा गार्डनपासून सेक्टर 15 ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात झाली.
यामध्ये 200हून अधिक सायकलस्वारांनी सहभागी होत ही रॅली यशस्वी केली. ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक अशोक पाटील, अंकुश सोनवणे यांच्यासह अनेक सायकलपटूंनी उस्फूर्त सहभाग घेतला. रेल्वे अपघातात आपले पाय गमावलेल्या रमेश शुक्ला या दिव्यांग जिद्दी सायकलपटूनेही या सायकल रॅलीत सहभागी होत सर्वांचा उत्साह वाढवला.