Breaking News

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याक डून मनी लाँडरिंगचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉटवर हातोडा पडणार असल्याचे पुढे येत आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणी सोमय्या हे नुकतेच दापोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान जर हे रिसॉर्ट पाडले नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशाराच सोमय्या यांनी या दरम्यान दिला आहे.

माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा सुरु झाली  आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी भाजप नेते सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोमय्या यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांच्या हातात प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही होता. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशाराच सोमय्या यांनी दिला.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांना आदेश देणार आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल, असा दावा किरीट सोमय्या यांनी या दरम्यान केला. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply