मध्य रेल्वेने केला नेरळकरांच्या भावनांचा आदर
कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन ऐवजी लब्धी गार्डन असे एम इंडिकेटरवर दर्शविले जात होते. याबाबत नेरळ ग्रामस्थ व प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ट्विटर हॅण्डल आणि रेल्वेच्या फेसबुक पेजवर तक्रारींचा भडीमार केला. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ जंक्शन स्थानकाच्या नावापुढे लागलेले लब्धी गार्डन हे नाव तात्काळ हटविले. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांच्या पुढे असलेल्या बांधकाम साईटची नावे हटविण्यात आली आहेत.
रेल्वे प्रवाशांना एम इंडिकेटर या अॅपवरून गाड्यांची सध्यस्थिती आणि वेळापत्रक यांची माहिती मिळत असते. या अॅपचा वापर दररोज लाखो प्रवासी करीत असतात. त्या अॅपचा वापर करून स्थानकांच्या नावापुढे आपल्या बांधकाम साईटचे नाव लावून त्या त्या स्थानकांचे ऐतिहासिक महत्त्व असलेले नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न बिल्डर लॉबीकडून सुरु होता. नेरळ रेल्वे स्थानकाच्या नावापुढे नेरळपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बांधकाम साईटचे नाव दाखविण्यात येत होते. मुळात ती बांधकाम साईट नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्येही नाही. ही बाब 20 जुलै रोजी सकाळी सोशल मीडियावरून माहित होताच समस्त नेरळकरांनी मध्य रेल्वे विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली.
नेरळ प्रवासी संघटना, भिवपुरी प्रवासी संघटना, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि नेरळमधील दर्वेश पालकर, सुमित क्षीरसागर, भास्कर तरे, प्रवीण मोर्गे यांनी थेट रेल्वेच्या ट्विटर हॅण्डलवर तक्रारी केल्या.
सोशल मीडियावरही सकारात्मक चर्चा घडवून आणली. तर एम इंडिकेटर अॅपसोबत संध्या देवस्थळे यांनी चर्चा केली आणि मध्य रेल्वेकडून नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक नावापुढील बिल्डरचे नाव काढून टाकण्याची कार्यवाही झाली. त्याबद्दल नेरळकरांनी आनंद व्यक्त केला.