इंदापुरात शिंदे गटाच्या मेळाव्यात आ. गोगावलेंचा इशारा
माणगाव : प्रतिनिधी
खोके, बोके काय असतात व आम्हाला गद्दार म्हणून हिणवणार्यांना आम्ही विधिमंडळाच्या पायर्यांवर आमचा हिसका अधिवेशन सुरु होण्याअगोदर दाखविला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक त्यांचे विचार, त्यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. आमच्या नादाला कुणी करायचा नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांनी इंदापूर येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना विरोधकांना दिला.
इंदापूर विभाग शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगेशी मंगल कार्यालय इंदापूर येथे शनिवार (दि. 27) उत्साहात झाला. यावेळी चौफेर टोलेबाजी करताना आमदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला. या मेळाव्यास शिवसेना नेते अँड.राजीव साबळे, शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर,उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, माणगाव तालुका प्रमुख अँड.महेंद्र मानकर, तळा तालुका प्रमुख प्रधुम्न ठसाळ, महाड तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, दाखणे गावचे सरपंच विश्वास उभारे माजी सभापती महेंद्र तेटगुरे, विभाग प्रमुख नितीन पवार, सुधीर पवार, रवींद्र टेंबे, शरीफ हारगे, विलास शिंदे, संपर्क प्रमुख नंदू तरडे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश नलावडे, उपतालुकाप्रमुख शरद सारगे, माणगाव तालुका युवाधिकारी राजेश कदम, तळा शहर प्रमुख राकेश वडके, माणगाव शहरप्रमुख सुनील पवार, अँड. सुशील दसवते, अँड. चेतन चव्हाण, अँड.राजेश लिमजे, अजित भोनकर विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला आघाडी प्रमुख, महिला संघटिका, विभागातील कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. गोगावले पुढे म्हणाले की, येणार्या काळात विरोधकांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. आमचे सरकार आल्यावर जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.
मी उद्या मंत्री व पालकमंत्री तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणार आहे. काहीजण मंत्री झाल्यावर हवेत जातात पण आम्ही ती मंडळी नाही.निजामपूरच्या सरपंचानी आमच्या विरोधात बोलू नये. त्यांनाही आम्ही आमचा हिसका दाखवू. येणार्या काळात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यात विकासकामे करणार आहे. दोन्ही सरकारचा निधी विविध विकासकामांसाठी आणू असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री नावालाच शिवसेनेचा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री नावाला शिवसेनेचा पण राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला चार नंबरवर खाली आणले. हे आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास अनेक वेळा आणूनदेखील त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यावर आम्ही सार्या मंडळींनी त्यांना साथ दिली. आम्ही बाहेर पडल्यावर अनेकवेळा आम्हाला परत या म्हणून त्यांचे फोन आले असेही आमदार गोगावले म्हणाले.