पनवेल : मिरची गल्ली स्वराज्य मित्र मंडळाने मिरची गल्लीचा राजा गणपती बाप्पाचे आगमन केले. या ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचा आगमन करण्यात आले.
पनवेल : रामप्रहर वृत्त
अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे सार्वजनिक मंडळांची लगबग वाढली आहे. पनवेल शहरात मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली असून पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाच्या आगमनाने जल्लोषाचे वातावरण दिसत आहे.
पनवेल परिसरात पेण आणि मुंबईवरून गणेशमूर्ती आणल्या जातात. पनवेलमध्ये गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तींच्या आगमनाच्या मिरवणुका मोठ्या थाटामाटाने काढण्यात येत आहेत. मंडपाच्या जागेपासून ठराविक अंतरावर या मिरवणुका काढल्या जातात. या गणेशमूर्ती स्थापन झाल्यानंतर मंडळांकडून सजावटीला सुरुवात करण्यात येते. शिवाय गणेश चतुर्थीला घराघरांतील गणपती आगमन होत असल्याने या काळात मंडळांच्या सदस्यांना गणेश आगमनाकडे तितकासा वेळ देता येत नाही. परिणामी, गणेश चतुर्थीपूर्वीच गणेश आगमनाची मिरवणूक काढण्यात येते. पनवेलमधील काही मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन सुरू झाले असून यासाठी काढण्यात येणार्या मिरवणुकांमुळे वातावरणात उत्साह संचारला आहे.
पाद्यपूजन आणि मंडप भूमिपूजन सोहळा म्हटले, की आबाल-वृद्धांच्या आनंदाला उधाण येते. गणेशोत्सवाची सुरुवात पाद्यपूजन आणि मंडपपूजन सोहळ्यातून होते. यासाठी गणेश मंडळांकडून ढोल-ताशा पथकांच्या साथीने पारंपरिक वाद्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे शहरातील उड्डाण पूल, मोकळ्या भूखंडांवर सध्या ढोल-ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे.