Breaking News

सागवानी दरवाजांमुळे कुलाबा किल्ल्याच्या सौंदर्यात भर

अलिबाग : प्रतिनिधी

मराठा आरमाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याला दोन सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. खार्‍या पाण्यापासून हे दरवाजे सुरक्षीत रहावेत म्हणून यावर विशेष लेप लावण्यात आला असून या दरवाजांना ऐतिहासीक रुप देताना टोकदार खिळे, लोखंडी पट्ट्यासह चार इंचाच्या सागवानी मजबूत पट्ट्या लावण्यात आल्या आहेत.

भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या कुलाबा किल्ल्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. अलिबाग शहराच्या बाजूचा महादरवाजा आणि पाठीमागील यशवंत दरवाजा असे दोन दरवाजे बसवण्यात आले आहेत. हे दोन्ही दरवाजे नव्याने बनवण्यात आले असून यासाठी 16 लाख 50 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

पुरातत्व विभागाने यापुर्वी किल्ले रायगड आणि जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बसवले आहेत. हे दरवाजे जास्त काळ ठिकावेत, यासाठी त्यांना एरंडतेल आणि बिबव्याच्या तेलाचे मिश्रण लावण्यात आले आहे. या दरवाजांमुळे कुलाबा किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली असल्याने अलिबाग येथे येणारे पर्यटक कुलाबा किल्ल्याला हमखास भेट देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कुलाबा किल्ल्यातील दोन दरवाजांचे काम पुर्ण झाले असून, चिरे निखळलेल्या बुरुजांच्या दुरुस्तीचेही काम सुरु आहे. या बुरुजांना चार थरांचे चिरे लावण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर त्याचे काम सुरु करुन काही दिवसात पुर्ण होईल. याबरोबर पुढील टप्प्यात किल्ल्यातील तलावाचे सुशोभिकरणाचेही काम हाती घेण्यात येणार आहे. -बी. जी. ऐलीकर, संवर्धन सहाय्यक, पुरातत्व विभाग-रायगड

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply