खारघर भाजपने अधिकार्यांना सुनावले; खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर हे सिडकोने वसविलेले शहर आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी सुविधांची जबाबदारी ही सिडको प्रशासनाची आहे. खारघर शहरात सिडकोने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यंदा मान्सून लवकर असताना रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने सिडको अधिकार्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. यासोबतच खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात झाल्यास सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सुद्धा सिडको प्रशासनाकडून शहरातील रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. मागील दोन तीन वर्षांत खारघर शहरातील विविध सेक्टर्समध्ये महावितरण, मोबाइल कंपन्या, महानगर गॅस तसेच पाण्याच्या पाइपच्या कामासाठी अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. अशा ठिकाणी अनेक वर्ष काम न झाल्याने रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी सिडकोने भरमसाट रक्कम वरील कंपन्यांकडून वसूल केलेले आहेत. या नादुरुस्त रस्त्यासाठी मागील एक वर्ष भाजपाकडून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला गेलेला असताना सुद्धा यावर काहीही कामे होताना दिसत नाही. या कामाचे निविदा सुद्धा मंजूर न झाल्याचे समजते याबद्दल सिडको कार्यकारी अभियंता रघुवंशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली.
खड्डे पडलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात चालणे व वाहन चालविणे अतिशय धोक्याचे आहे. नादुरुस्त रस्त्याची कामे पावसापूर्वी झाले नाहीत आणि जर का अशा रस्त्यावर अपघात झाला तर त्याला सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. येत्या दहा दिवसांत खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा मागणीचे पत्र खारघरमधील भाजप शिष्टमंडळाकडून देण्यात आले.
या वेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, सरचिटणीस दीपक शिंदे, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, उपाध्यक्ष संजय घरत, निर्दोष केणी, सस्मित डोळस, काशिनाथ घरत आदी उपस्थित होते.