लालपरीमध्ये लाल डब्याची एसटी गाडी अर्थात राज्य परिवहन महामंडळ चालवीत असलेली प्रवाशांची आपली गाडी. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागाला जोडणारी गाडी म्हणून रस्त्यावर आणताना त्यावेळी असलेले लाल मातीचे रस्ते आणि ती लाल माती अंगाखांद्यावर खेळवत जनतेला, प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहचविणारी म्हणून त्यावेळी एसटी गाडी लाल रंगाची बनली. कालानुरूप एसटी गाडीमध्ये बदल झाले, पण लाल रंगाच्या गाडीचा रुबाब काही न्याराच होता. हे आज पन्नाशी पार केलेली, परंतु त्यावेळी लाल गाडीतून प्रवास करून आपल्या गावापासून शाळा-कॉलेजच्या ठिकाणी सुखरूप नेणारी गाडी म्हणून आपली सेवा देणारी ते कधीही विसरणार नाहीत. त्याच लाल डब्याच्या गाडीने कर्जत तालुक्यातील गावो-गावे जोडली गेली, मात्र आज तीच लाल डब्याची एसटी गाडी मोठ्या मोठ्या गावात दिसेनाशी झाली आहे. त्यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणून राज्य परिवहन मंडळाची गाडी महत्वाची समजली जायची. मात्र मागील काही वर्षे सातत्याने कर्जत एसटी आगारातून चालविली जाणार्या एसटीच्या फेर्या आणि मार्ग बंद केले जात आहेत. ग्रामीण भागातील मार्ग बंद करून त्या गाड्या अलिबाग, पनवेलकडे वळविल्या जात असून त्याबद्दल ग्रामीण भागातील जनता आता मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत.
कर्जत येथे राज्य परिवहन मंडळाचे आगार असून त्या आगाराचे मुख्य स्थानक हे खालापूर तालुक्यातील खोपोली आणि कर्जत तालुक्यातील नेरळ ही आहेत. या दोन्ही स्थानकातून वेगवेगळ्या ठिकाणी एसटी गाड्या सोडल्या जात होत्या. एकेकाळी कर्जत एसटी आगार राज्यात सर्वाधिक नफा मिळविणार्या एसटी आगारात पहिल्या चार क्रमांकात आला होता. त्यात खोपोली येथील आगारातून चालविली जाणारी पेण आणि पनवेल तसेच लोणावळा या गाड्या प्रवाशांची गर्दी वाहून नेत होत्या. खोपोली या खालापूर तालुक्यातील गावात असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे या ठिकाणी सोन्याचा धूर यायचा असे म्हणतात. त्याचवेळी या खोपोली गावातून आणि खोपोली एसटी स्थानकाच्या बाजूने मुंबई-पुणे हा गजबजलेला राष्ट्रीय महामार्ग असल्याने हे एसटी स्थानकदेखील सतत गजबजलेले असायचे. परंतु खोपोली येथील औद्योगिक वसाहती बंद झाल्या आणि खोपोली एसटी स्थानकाला अवकळा आणि त्यात पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे झाला आणि खोपोली एसटी स्थानक आणखी भकास झाले. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एसटी स्थानकातून पूर्वी अलिबाग आणि पनवेलदेखील एसटीच्या गाड्या सोडल्या जायच्या. त्याचवेळी तेथून नंतरच्या काळात दररोज एसटीच्या 103 फेर्या विविध भागात होत होत्या. मात्र आज नेरळ एसटी स्थानकाला देखील अवकळा आली असून आपल्या हक्काच्या जागेसाठी नेरळ एसटी स्थानक अखेरची धडपड करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या संस्था बंद पडत असतील तर मग मुख्य संस्थेला कशी उभारी येणार? हा प्रश्न कर्जत एसटी आगराला म्हणजे कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्याच्या आगाराला बरोबर लागू पडतो. त्यावेळी गाड्या नवीन मिळत नाहीत, जुन्या गाड्यांची नेहमी करावी लागणारी दुरुस्ती आणि अपुरा कर्मचारी वर्ग हे कर्जत एसटी आगाराच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे. परिणामी कर्जत एसटी आगार हे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार्या लोकांचे जवळचे वाहतुकीचे केंद्र होते.
तालुक्याचे शेवटच्या टोकावर या आगारातून एसटी गाड्या सोडल्या जायच्या. ज्या कारणासाठी कर्जत एसटी आगाराची निर्मिती झाली, तेच कारण गेल्या काही वर्षात मागे पडले आहे. कारण कर्जत एसटी आगारातून आता बाहेरच्या गाड्या जास्त आणि तालुक्यातील गाड्यांच्या फेर्या कमी अशी स्थिती बनून राहिली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक मार्ग गेल्या काही वर्षात कर्जत एसटी आगाराने बंद केले आहेत. ज्या एसटीच्या हक्काच्या प्रवासाची हमी असल्याने शालेय विद्यार्थी पुढे महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत असतात, त्या विद्यार्थ्यांना एसटीच्या फेर्या बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कर्जत आगारातील तसेच नेरळ आणि खोपोली स्थानकातून सुटणार्या गाड्यांच्या फेर्या देखील कर्जत आगार प्रमुख यांचे नियोजन कमी पडत असल्याने बंद झाल्या आहे आणि काही ठिकाणी या फेर्या बंद होताना दिसत आहेत. प्रत्येक गाडीचा मार्ग बंद करताना एसटीच्या कर्मचार्यांना प्रवासी मिळत नाहीत असे उत्तर देण्याची सवय लागून राहिली होती. ती आजही कायम आहे, पण पूर्वीचा आणि आजचा विचार केला तर पूर्वी सामान्य लोक हे पायी प्रवास करून जायचे आणि त्यातही निम्मे हे एसटी वेळेवर पोहचेल या भरवशावर थांबून राहायचे. त्याला कारण देखील तसेच होते, त्यावेळी एसटीच्या गाड्या या वेळेवर धावायच्या. परिणामी प्रत्येक प्रवाशांचा इच्छित स्थळी जाण्याचा प्रवास हा वेळेवर व्हायचा. आता वाहने वाढली आहेत, त्यामुळे आपोआप वाहतूक कोंडीची समस्या सर्वांना भेडसावत असून त्याला एसटी गाड्या अपवाद नाहीत. पण कर्जत तालुक्यात एसटी मंडळाच्या कर्मचारी वर्गाची उदासीनता ही खर्या अर्थाने प्रवासी संख्या कमी होण्यात महत्वाचे कारण आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात प्रवासी तक्रार हे एसटी गाडी रिकामी असताना आमच्या अंगावर धुरळा उडवून न थांबता निघून गेली. हे प्रश्न सर्रास उपस्थित होत असताना कर्जत तालुक्यात हात दाखवा एसटी थांबवा हा प्रयोग देखील यशस्वी होऊ शकला नाही हे देखील सत्य आहे. त्यामुळे कधी काळी कर्जत तालुक्यातील सर्वाधिक गजबजलेले आणि जास्त महसूल देणारे मार्ग कर्जत एसटी आगाराने बंद केले आहेत. त्यात नेरळ-सुगवे आणि कळंब-पाषाणे हे दोन्ही मार्ग एकावेळी दोन गाड्यांचे प्रवासी उपलब्ध असताना देखील आगाराने वेगवेगळ्या कारणांनी बंद केले आहेत.हे दोन्ही मार्ग तालुक्यात सर्वाधिक महसूल देणारे मार्ग होते. त्याचवेळी सध्या ओलमण मार्गे बंद केला असून त्या ठिकाणी दिवसभरात अनेक फेर्या व्हायच्या आणि प्रामुख्याने येथील वस्तीला असलेली गाडी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मदतगार ठरत होती. खांडस नांदगाव हा कर्जत तालुक्याचा आदिवासी भाग, मात्र त्या ठिकाणी अनेक गावे आणि वाड्या असून देखील एसटीची केवळ एक फेरी सध्या सुरू आहे.
नेरळ एसटी स्थानकातून सोडल्या जाणार्या नेरळ-वाकस-कशेळे, नेरळ-शिंगढोल, नेरळ-देवपाडा, नेरळ-साळोख, नेरळ-पोशिर, नेरळ-बोरगाव, नेरळ-वारे या फेर्या बंद झाल्या आहेत. तर खोपोली येथील स्थानकातून महत्वाचा व्यवसाय देणारा आडोशी मार्ग बंद झाला आहे. त्यापूर्वी कर्जत तालुक्यातील जामरुख, साळोख, कडाव, कशेळे, मांडवणे, पोटल हे मार्ग बंद झाले असून मेचकरवाडी येथील फेरी एकमेव करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आंबिवली आणि कोथिंबे या फेर्या इतिहास जमा झाल्या असून बीड गाडी देखील बंद झाली असून कर्जत एसटी आगार हे आता ग्रामीण भागापेक्षा बाहेरच्या मार्गांना प्राधान्य देत आहे. सांडशी गाडी सुरू आहे पण प्रवासी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यातील ओलमण आणि पोटल या गाड्यांच्या सात फेर्या आता एक वर येऊन थांबल्या आहेत. कर्जत एसटी आगारातून सध्या पनवेल आणि अलिबाग कडे सर्वाधिक गाड्यांचा लोंढा पाठविला जात असून कर्जत आगार हे ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यासाठी आणि की जिल्ह्यात जाण्यासाठी आहेत याचे उत्तर मिळत नाही.
-संतोष पेरणे, खबरबात