Breaking News

दरडींच्या धोक्याचा सामना

भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार महाडमधील 49, पोलादपूरमधील 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत व पनवेलमधील प्रत्येकी 3 तर श्रीवर्धन 2 आणि तळा येथील 1 गाव दरडप्रवण असल्याचे म्हटले गेले आहे. याखेरीज अनेक गावांना पावसाळ्यात पुराचा धोकाही असतोच. हे सारेच घटक लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगांच्या विशेषत: पश्चिमेकडील उताराला आणि तिथल्या विखुरलेल्या टेकड्यांना कोसळणार्‍या दरडी तशा नव्या नाहीत. इथल्या गावकर्‍यांनी वर्षानुवर्षे त्यांचा अनुभव घेतला आहे. परंतु जुलै 2005 मध्ये महाडमधील दसगाव येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना रायगडवासीय अजुनही विसरलेले नाहीत. त्यामुळेच ‘रायगडातील 103 गावांना दरडींपासून धोका’ अशा आशयाचे मथळे गावकर्‍यांच्या मनाचा निश्चितच थरकाप उडवतात. परंतु अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वा त्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिले असून योग्य ती खबरदारीची उपाययोजना केल्यास मनुष्यहानी टाळण्याची दक्षता घेता येईल, असे सुचवले आहे. रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या घटनांच्या आजवरच्या नोंदी उपलब्ध असून भूगर्भीय सर्वेक्षणांतून संभाव्य धोक्यांविषयी माहिती उपलब्ध झाली आहे. ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या वतीने रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 103 गावांना दरड कोसळण्याचा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 20 गावांसमोरील धोका अधिक तीव्र स्वरुपाचा असल्याचे सांगितले गेले आहे. अलीकडेच जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील बैठक पार पडली असून तीत पावसाळ्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये करण्यात यावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मुसळधार पाऊस, त्याचे सातत्य आणि दरडी कोसळण्याचा निश्चितपणे परस्पर-संबंध आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडे व दक्षिणपूर्वेकडील डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही काही अभ्यासातून निदर्शनास आले आहे. पाऊस, भूपृष्ठाचा उतार, रचना या भू-पर्यावरणीय घटकांबरोबरच तिथे होणारा पाण्याचा निचरा, रस्त्यांची बांधणी करताना उतार आदींमध्ये केले गेलेले बदल या सार्‍याचाच परिणाम दरडी कोसळण्यावर होत असतो. जिल्ह्यात मान्सूनच्या संपूर्ण कालखंडात वार्षिक सरासरी 3000 मिमीहून अधिक इतका प्रचंड पाऊस पडतो हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. याच काळात जिल्ह्यातील दक्षिण व दक्षिणपूर्व भागात जिथून प्रामुख्याने रस्ते जातात, त्या भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. तुलनेने किनारपट्टीनजीकच्या भागातील उतार हा अधिक स्थिर स्वरुपाचा आहे, असे तज्ज्ञ नमूद करतात. विशेषत: कशेडी घाट, भोर, कार्ले खिंड, आंबेनळी, पोलादपूर, खालापूर अशा घाटांमध्ये खबरदारीची उपाययोजना अधिक सजगतेने करावी लागणार आहे. रस्त्यांवरील अपघात टाळण्याच्या दृष्टीने धुक्यात दिसणारे फलक, सिग्नल व ब्लिंकर लावण्याच्या सूचना रस्ते विभागाला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या प्रयत्नांना संस्था, संघटना व जनसामान्यांच्या सतर्कतेची जोड लाभल्यास निश्चितपणे आपत्कालीन व्यवस्थापन अधिक उत्तमरीतीने पार पडू शकेल.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply