शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे, मात्र मेळाव्यादरम्यान काही गोंधळ झाल्यास या मुद्द्यावर भविष्यात परवानगी न देण्याबाबत सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाजी पार्कवर 5 ऑक्टोबरला होणार्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मागितलेली परवानगी महापालिकेने नाकारली होती. यानंतर ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने सुधारित याचिका दाखल करण्याची मागणी मान्य केली होती. आधीच्या याचिकेत महापालिकेला परवानगीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीची परवानगीही मागण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने ठाकरे गटाला सुधारित याचिका करण्याची परवानगी दिली.
दुसरीकडे मुंबई महापालिकेने ठाकरे गटाचा अर्ज आम्ही फेटाळल्याने त्यांच्या याचिकेला काही अर्थ नाही, असा दावा करून ठाकरे गटाच्या सुधारित याचिका करण्याच्या मागणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने विरोध केला होता. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली होती.
दरम्यान, शिंदे गटाने केलेली मध्यस्थ याचिकाही ठाकरे गटाच्या याचिकेसह सुनावणीसाठी ठेवण्याचे न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमळ खाता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती. दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांचा गट त्याची शिवसेना खरी असल्याचा दावा करून न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाची याचिका फेटाळण्याची मागणी सरवणकर यांनी केली होती. शिंदे गटाची शिवसेना खरी असून शिवाजी पार्कवर आम्हाला दसरा मेळाव्यासाठी देण्याची मागणी करणारा अर्ज महापालिकेकडे केल्याचा दावाही त्यांनी केला होता.
खरी शिवसेना कोणती याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याची बाब उद्धव ठाकरे गटाने लपविल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. अशा स्थितीत या न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्यास ते या वादाच्या दृष्टीने चुकीचे ठरेल, असा दावा सरवणकर यांनी याचिकेत केला तसेच हा वाद संपुष्टात येईपर्यंत शिवसेनेच्या याचिकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची हा विषयच नसल्याचे म्हणत सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली. यानंतर शिंदे गट आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती अॅड. उत्सव त्रिवेदी यांनी सांगितले. त्यामुळे दसरा मेळाव्यासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आणि हा निर्णय किती दिवसांत येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
…तर भविष्यात परवानगी नाही!
उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली. यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी घ्यावी. यासाठी पोलीस मेळाव्याचे चित्रिकरण करतील, असे निर्देशही दिले आहेत.