खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 23) वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण विभाग संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाणिज्य व शिक्षण व्यवस्थापन विभागाच्या पहिल्या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रतिकृती आणि भित्तिपत्रकांसमवेत उस्फूर्त सहभाग नोंदिवला. या वेळी प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी 2020चे नवीन शैक्षणिक धोरण, भविष्यकाळात येणार्या शैक्षणिक समस्या तसेच कौशल्याधित शिक्षण देणे व समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, असा संदेश सर्व प्राध्यापकांना दिला. येणार्या काळामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व महाविद्यालयांना पुरविल्या जातील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल असे आश्वासित केले.
व्यवस्थापन शिक्षण संघटनेची प्रस्तावना प्रा. रीत ठुले व वाणिज्य संघटनेची प्रस्तावना प्रा. नम्रता गजरा यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीनल कुडवलकर, रफत कारभारी, सागर सिंग या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. प्रवर शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर या सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.