दिवाळीनंतर पक्ष वाढवण्याचे काम जोमाने करणार -आमदार महेंद्र दळवी
पेण : प्रतिनिधी
पाबळ विभागातील शेकाप तसेच उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिवाळी मुहूर्तावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) पक्षात प्रवेश केला. दिवाळीनंतर बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचे काम जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. उद्धव ठाकरे गटाचे पाबळ विभाग प्रमुख नरेश शिंदे, पाबळ ग्रामपंचातीचे तीन विद्यमान सदस्य, वरप ग्रामपंचयतीचे दोन विद्यमान सदस्य व एक माजी सदस्य यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमदार महेंद्र दळवी यांच्या राजमळा येथील निवासस्थानी जाऊन बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत. आमच्यावर विश्वास ठेऊन तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आलात, हे आनंदाचे आहे. आम्ही लोकांच्यात असतो, लोकांचे सुख दुःख जाणतो. पक्षाचा यापुढील मेळावा पाबळ विभागात होईल असे आमदार दळवी यांनी या वेळी सांगितले. शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संघटक मयुर गंभीर, तालुका प्रमुख तुषार मानकवळे, संजय म्हात्रे, पेण तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल, ज्ञानेश्वर शिर्के, बापू शिद यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.