कर्जत : प्रतिनिधी
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरान शहरात पर्यावरणपूरक सात ई-रिक्षा चालविण्यास राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. त्यातील पाच ई-रिक्षांमधून 5 डिसेंबरपासून प्रवास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 20) आणखी दोन ई-रिक्षांनी माथेरानमध्ये प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहने चालविण्यास सुरुवात केली आहे. 5 डिसेंबरपासून माथेरान नगर परिषदेकडून ई-रिक्षा चालविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मंजूर असलेल्या सातपैकी पाच ई-रिक्षांनी प्रवासी वाहतूक सुरू केली होती. गेले 15 दिवस सकाळी सहा ते नऊ या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी सेंट झेवियर्स स्कूल आणि प्राचार्य गव्हाणकर विद्यालय अशी वाहतूक सुरू ठेवली आहे. दोन ई-रिक्षांना तांत्रिक कारणांमुळे मोटर वाहन निरीक्षकांनी परवानगी नाकारली होती. ती तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर मंगळवारपासून त्या दोन ई-रिक्षा सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत स्थानिक नागरिक, वृद्ध यांच्यासाठी प्रवासी वाहतूक सुरु ठेवली आहे. दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी पुन्हा विद्यार्थ्यांच्या दिमतीला ई-रिक्षा चालविल्या जातात. शनिवार आणि रविवारी रात्री दहापर्यंत ई-रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ई-रिक्षांसाठी ताशी 20 किमी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली असून माणसांची गर्दी असेल तेथेच हॉर्न वाजवून पुढे प्रवास करण्याचे आदेश रिक्षा चालकांना देण्यात आले आहेत.