Thursday , March 23 2023
Breaking News

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही : रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आम्ही अभिमानाने विधानसभा निवडणुकीला मते मागू शकतो. लोकसभा ही विधानसभेची सेमीफायनल आहे. त्यामुळे घरचे टाकून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली, अशी बातमी काही चॅनेलवर दाखवली जात आहे. याबाबत रामशेठ ठाकूर म्हणाले की, शरद पवार यांची आणि माझी भेट महिन्यापूर्वी आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी झाली, पण ती भेट राजकीय नव्हती, तर शिक्षण क्षेत्रासंबंधित होती. खारघर येथे टाटा इनोव्हेशन सेंटरसंदर्भात रयत शिक्षण संस्थेचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत ती भेट होती.

शरद पवार आणि माझे संबंध नक्कीच चांगले आहेत, मात्र राजकीय नाही. 2004 साली मी त्यांच्या पक्षात यावे, ही त्यांची खूप इच्छा होती, पण मी त्यांच्या पक्षात गेलो नाही. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरद पवार यांची वर्षांतून सहा ते सात वेळा रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट झाली. नुकतीच फुंडे आणि वाशी येथील ‘रयत’च्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्या वेळीही वावड्या उठवण्याचे काम केले गेले. त्यात कोणाचा हेतू काय आहे ते सांगता येणार नाही, मात्र ती भेट फक्त सामाजिकदृष्ट्या होती. खारघर येथे संस्थेच्या माध्यमातून आणि टाटा सेंटरच्या सहकार्यातून शिक्षणासाठी प्रकल्प उभारला जात आहे. त्यामध्ये टाटाने व संस्थेने योगदान दिले आहे आणि त्यात मी आर्थिक योगदान दिले आहे. या प्रकल्पासंदर्भात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भेट घेतली होती, मात्र ती भेट गेल्या आठवड्यात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर नव्हती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी व रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात होती. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढणे चुकीचा आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply