पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची
माथेरान : रामप्रहर वृत्त
घोडा ही माथेरानची शान म्हणून संबोधले जाते. येणारे पर्यटक घोड्यावर बसून रपेट मारण्यासाठी उत्सुक असतात. खासकरून घोडेस्वारीसाठी सुध्दा येणार्या पर्यटकांची संख्या अधिक असते. पर्यटकांसाठी एक हौशी वाहन म्हणून पाहिले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून घोड्यावर बसणार्या पर्यटकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच काहीवेळा अल्पवयीन मुले तसेच नवखे अश्वचालक ज्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना सुध्दा घोड्यावर काम करण्यास ठेवले जाते. त्यामुळे नवख्या पर्यटकांना घोडेस्वारी करताना तोल जाऊन अथवा घोड्याचे नियंत्रण सुटल्यावर अपघात होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नवख्या पर्यटकांसाठी घोडेस्वारी म्हणजे एकप्रकारे जोखमीचे प्रवासी वाहन असून डोक्यावर हेल्मेट परिधान न करता घोडेस्वारी केल्यास चुकून अपघात घडू शकतात. हल्ली पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावरून घोडे घसरून पडतात अशा घोडेवाल्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत परंतु यापूर्वी लाल मातीच्या रस्त्यावर अपघात कसे झाले, या अनेकांना त्या अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले होते. लाखो रुपये खर्च करून उत्तम दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविले जात आहेत. आणि याच रस्त्यावरून घोडेचालक सुध्दा सुसाट वेगाने पळवतात त्यावेळी अपघात होत नाहीत. जर का हे घोडे पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावरून घसरत असतील तर कदाचित त्या घोड्याच्या पायाच्या नालांची झीज झाल्यामुळे तो घोडा घसरला हे मान्य करावे लागणार यात शंकाच नाही. परंतु ब्लॉकचे रस्ते घोड्यासाठी अयोग्य आहेत असा आव आणला जात आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून याठिकाणी धूळ विरहित रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ब्लॉकचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.त्यामुळे घोडेवाल्यांनी सुध्दा आपल्या व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे. लोखंडी नालामुळे जर का घोडे घसरत आहेत तर रबरी नालांचा उपयोग करणे आवश्यक आहे. पण असे पर्याय या व्यावसायिकांना मान्य नाहीत आम्ही कसेही वागू आणि विकास कामांना विरोध करू ही भूमिका कायम घेतल्यामुळे हे गाव या मंडळींपायी खूपच पिछाडीवर पडले आहे. प्रवासी वाहतूक करणारे आणि प्रवासी वाहतूक करणार्या घोड्याची संख्या जवळपास सहाशे पेक्षाही अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे रस्त्यावर घोड्याच्या लिदीचे थरावर थर दिसतात. यामुळे ही लिद (विष्ठा) नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. आजवर अनेकांना घोड्यावर बसून प्रवास करताना सुरक्षा कवच अस्तित्वात नाही. एका बंगले धारकाने स्वतः मोफत हेल्मेटचे वाटप केले होते परंतु त्याचा वापर या घोडेवाल्यांनी केलेला नाही. त्यामुळे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपघातांची मालिका –
यापूर्वी सन 1997 साली एका विदेशी महिला पर्यटकांना घोडा बेकाबू झाल्यामुळे लुईझा पॉईंटवरून पडून घोड्यासह त्या विदेशी महिलेचा मृत्यू झाला होता. सन 2000 दरम्यानच्या काळात सिनेनिर्माते आचार्य यांचा घोड्यावरून पडून दुर्दैवी अंत झाला होता. 2015 मध्ये इंडिया मेह्यू ही परदेशी महिला घोडेस्वारी करताना घोड्याच्या पायाखाली येऊन मृत्यमुखी पडली होती. 2016 मध्ये नीलम सिंग या पर्यटक महिलेचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता. 2018 मध्ये मुंबई ग्रँटरोड येथील रशीदा रेडिओवाला या महिलेला घोड्यावरून पडून गंभीर दुखापत झाली होती. तर भिवंडी येथील अश्रफ खान या पर्यटकाला सुध्दा दस्तुरी नाका याठिकाणी अशाचप्रकारे पडून गंभीर दुखापत झाली होती. 2023 मध्ये नुकताच हनिमूनला आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख याचाही घोडा उधळल्यामुळे खाली पडून गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे.