Breaking News

बोर्झे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन

पेण : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असून वाशी खारेपाट विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 5) बोर्झे येथे केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा नियोजन समिती मार्फत पेण तालुक्यातील बोर्झे-कणे रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन बुधवारी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हा विभाग माझा हक्काचा आहे. समाजाच्या विकासाठी राजकारण सोडून सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे मत आमदार पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर पेण तालुक्यातील वाशीनाका ते काळेश्री या रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपये उपलब्ध झाले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. खारेपाटातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत 38 कोटी रुपये मंजूर झाले असून येत्या मार्चपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.  ‘सुनील तटकरे आज वाशी विभागात येऊन मोठ्या गमजा मारत आहेत. ते राज्याचे जलसंपदामंत्री असताना त्यांना पेण खारेपाटातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा दिसला नाही. खोटं बोल पण रेटून बोल, हा एकच अजेंडा त्यांनी चालवला असून स्वतः मंत्री असताना त्यांनी काय केले, हे जनतेला ठाऊक आहे. अशा भूलथापा देणार्‍यांना वाशी विभागाची जनता कदापि स्वीकारणार नाही, असे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, वाशी सरपंच गोरख पाटील, बोर्झे सरपंच विजया ठाकूर, उपसरपंच विजय ठाकूर, सदस्य संभाजी पाटील, सुषमा पाटील, मयुरी ठाकूर, सुप्रिया पाटील, तसेच जितेंद्र म्हात्रे, अ. जा. ठाकूर, म. प. म्हात्रे, विवेक म्हात्रे, विलास म्हात्रे,  मोरेश्वर पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ग्रामपरिवर्तन आघाडीच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply