Breaking News

खालापुरात कापलेल्या भातशेतीचे नुकसान

शेतकरी हवालदिल; नुकसानभरपाईची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने तयार झालेल्या भात पिकांची नासाडी केली असून, शेतात उभे असलेले भातपिक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतात तयार झालेले भातपीक कापण्यासाठी शेतकर्‍यांनी  सुरुवात केली खरी, पण बुधवारी दुपारच्या दरम्यान पडलेल्या अवेळी पावसाने उभे असलेले भातपीक आडवे झाले आहे. तर कापलेले भातापिक पाण्यात भिजून खालापुरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे वावंढळ येथील शेतकरी विलास (बाळा) कदम यांनी सांगितले.

या वर्षी वादळवारा, अतिवृष्टी, जमिनीची धूप होत असतानाच भातपिक चांगल्या प्रकारे आले होते. काही प्रकारची भातपीक कधीच तयार झाली आहेत, पण घटस्थापनेपूर्वी व नवरात्रीमध्ये पडलेल्या पावसाने भातशेती कापणे शक्य झाले नाही.

गेले चार दिवस पाऊस पडला नाही, चक्क ऊन पडले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी भातपीक कापण्यास सुरुवात केली होती, पण बुधवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापलेले भात भिजून गेले आहे तर उभे असलेले भात आडवे पडले. शेतात साचलेल्या पाण्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

येथील अनेक शेतकरी ई-पीक पहाणी, विमा यापासून दुर्लक्षित आहेत. स्मार्ट फोन नसल्याने तसेच नेटवर्क मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांची ई-पीक नोंद न झाल्याने त्यांचे अगोदरच नुकसान झाले आहे. बुधवारी पडलेल्या पावासामुळे ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply