गावदेवी केंद्रात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या वतीने जागरूक पालक सदृढ बालक अभियानास गुरुवारी (दि. 9)पासून सुरुवात झाली. हे अभियान मुलांप्रमाणेच पालकांपर्यंत पोहचण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. येणार्या काळात महापालिकेची नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. या अभियानासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागास शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे या दृष्टीने महानगरपालिका व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमानातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करण्यात आले आहे. गावदेवी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख रूपेश ठोबरे, आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी सुदृढ, निरोगी राहावा, यासाठी आरोग्य सेवा तथा अभियान संचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारपासून पुढील आठ आठवडे जागरूक पालक सदृढ बालक अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील महापालिका क्षेत्रातील बालकांची -किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावदेवी मंदिराजवळील महानगरपालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केले. या वेळी आयुक्त गणेश देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मधुकर पांचाळ, एमजेपीजेएवायचे जिल्हा विभागीय समन्वय जाहिद शेख, बाळासाहेबांची शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, आरसीएच अधिकारी रेहाना मुजावर, अधिक्षक किर्ती महाजन, राष्ट्रीय बालसुरक्षा अभियानाचे पाच पथकांचे वैद्यकिय अधिकारी, मुख्यालय वैद्यकिय अधिकारी, शिक्षिका, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या विषयास अनुसरून भव्य रक्दान शिबिराचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, रोटरी क्लब ब्लड बँक खांदा कॉलनी, सुधागड स्कूल, एमजीएम हॉस्पिटल, कामोठे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे आयोजन करण्यात आले होते. पुढील आठ आठवडे सुरू असणार्या जागरूक पालक सदृढ बालक अभियानांतर्गत तपासण्यामध्ये वैद्यकिय अधिकार्यांनी संदर्भित केलेल्या बालकांची पुढील तपासणी तज्ज्ञामार्फत दर मंगळवारी आणि शुक्रवारी उपजिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात येणार आहे, तसेच या तपासणी दरम्यान जर बालकांची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली तर दर शनिवारी उपजिल्हा रूग्णालयामध्ये तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत.