मुंबई : प्रतिनिधी
एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र 1 एप्रिलपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. जरी काही भागात ढगाळ वातावरण असले तरी शेतकर्यांनी घाबरण्याची गरज नाही, कारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचेही खुळे म्हणाले.
हवामान विभागाने महाराष्ट्रात 30 आणि 31 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते, पण आता पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता जाणवत नाही. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांची शेतकर्यांनी काढणी सुरू करावी, असे आवाहनदेखील खुळे यांनी केले आहे.
6 ते 9 एप्रिलदरम्यान ‘अवकाळी’ची शक्यता
दरम्यान, 6 ते 9 एप्रिलपर्यंतच्या चार दिवसांत सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलढाणा, वर्धा, नागपूर जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …