कामोठे ः प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना खासदार बारणे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्याने त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केेले. त्याचप्रमाणे पनवेल येथे होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
सभेला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, विकास घरत, कुसूम म्हात्रे, हेमलता गोवारी, अरुणा भगत, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते सुनील गोवारी, हर्षवर्धन पाटील, प्रदीप भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि संसदेतील कामगिरी याची माहिती दिली तसेच विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे ते काहीही करीत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत आपल्या देशाने मोठी भरारी घेतली आहे. भारत अगदी चंद्रावर जाऊन पोहचला, तर दुसरीकडे दुर्गम अशा आदिवासीवाड्या, वस्त्यांवर वीजपुरवठा आणि रस्त्यांचे काम केल्याचेही त्यांनी सांगत सर्वच क्षेत्रात देशाची कामगिरी उल्लेखनीय आहे याकडे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, देशात होणारी लोकसभेची निवडणूक ही पुढील पिढीचे भविष्य ठरवणारी आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची चिंता जितकी आपल्याला आहे त्यापेक्षा जास्त या पिढीचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना विजयी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मताधिक्क्य देऊन विजयी करा.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …