Breaking News

रायगडात मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न अयशस्वी ठरतील -भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघात विरोधकांकडे विकासासंदर्भात सांगण्यासारखे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे ते भाविनक मुद्दे प्रचारात आणून मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनाच मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर मतदान करतील, असा दावा रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 29) अलिबागमध्ये व्यक्त केला.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारात महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी अलिबागमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. त्या वेळी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भूमिका मांडली.
आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, गिरीश तुळपुळे, हेमंत दांडेकर, मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते.
विकसित भारत या मुद्द्यावर भाजप ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलत आहोत. आमच्याकडे विकासाबाबत सांगण्यासारखे बरेच आहे. आम्ही ते सांगतो. विरोधकांकडे विकासकामांसंदर्भात सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत आहेत, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र ते यशस्वी ठरणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ केवळ हिंदूंनाच होत नाही, तर मुस्लिम समाजालादेखील मिळत आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील. रायगड मतदारसंघात मुस्लीम समाज खासदार सुनील तटकरे यांनाच मतदान करतील, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कुणीच बदलू शकत नाहीत. घटना बदलणार हा काँग्रेसचा अपप्रचार आहे. काँग्रेसने घटनेत 80 वेळा दुरुस्ती केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव केला. याउलट भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला. भाजपने देशात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. डॉ. आंबेडकर यांचे परदेशातील निवासस्थानाचे स्मारक केले. त्यांच्या जीवनाशी संबंधित स्थळे विकसित केली. काँग्रेसला हे करता आले नाही आणि आता काँग्रेसला बाबासाहेबांचा पुळका येतोय, अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
अनंत गीते सहा वेळा खासदार होते. दोन वेळा केंद्रात मंत्रीही होते. या कालावधीत त्यांनी रायगडसाठी कोणती विकासकामे केली ती सांगावीत. याउलट महायुतीच्या आमदारांनी अनेक कामे केली आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी विकासकामे केली आहेत. ते पालकमंत्री असताना अनेक प्रकल्प त्यांनी आणले आहेत. त्याचा फायदा या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना होईल. यापूर्वी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढलो आहोत. एकमेकांवर आरोप केले आहेत, परंतु हे विसरून देशाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांशी समन्वय ठेवून या लोकसभा निवडणुकीत काम करतील आणि खासदार सुनील तटकरे यांना विजयी करतील, असा विश्वास आमदार दरेकर यांनी व्यक्त केला.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply