खालापुर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई – पुणे महामार्गावरील खोपोली शीळफाटा येथे बुधवार (दि. 22) दुपारी मारुती स्विफ्ट, मारुती सियाज व दुचाकी या तीन गाड्यांमध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार किशोर लांडगे जागेवर मृत्यूमुखी पडले, तर सहाजण जखमी गंभीर जखमी झाले. त्यांना खोपोली येथील रुग्णायलयात दाखल करण्यात आले आहे.
स्विफ्ट गाडी (एमएच-01,एइ-5970) खोपोलीकडून मुंबईकडे जात होती. शीळफाटा येथील एचडीएफसी बँकेसमोर गाडीचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला व स्विफ्ट गाडीने समोर उभ्या असलेल्या सियाज गाडी (एमएच-46,एपी-1085)ला जोरदार ठोकर दिली. व दुचाकी (एमएच-06,ए-5280) हिला धडकली. ही धडक अतिशय जोरात व समोरासमोर झाल्याने दुचाकीवरील किशोर लांडगे (रा. वरची खोपोली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार हिरामण पोपट सुतार (वय 55) हे गंभीर जखमी झाले. तसेच स्विफ्ट गाडीमधील तेजस शहा (वय 34), कांतीलाल शहा (वय 63), शीतल शहा (वय 38), जयनाम शहा (वय 14), नमन शहा हे एकाच कुटूंबातील सदस्य जखमी झालेत. त्यांना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात व जाखोटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच वेळात खंडाळा घाटात दस्तुरीजवळ मोटारसायकल व कारमध्ये झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.