Breaking News

टंचाईग्रस्त कळंब ग्रामपंचायत हद्दीत झिंक अ‍ॅल्युमिनियम टाक्यांतून पाण्याची व्यवस्था

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. त्यांनी जलस्वराज्य दोनमधून पाण्याच्या टाक्या उभ्या करून पाणीटंचाई भागात कायम स्वरूपी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. कळंब ग्रामपंचायतीमध्ये तिन ठिकाणी झिंक अल्युमिनियम टाक्या उभ्या करण्यात आल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाणी टंचाईत झिंक अल्युमिनियम टाकी मदतीला येऊ शकते, हे लक्षात आल्याने रायगड जिल्हा परिषदेने जलस्वराज्य दोनमधून कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहुचीवाडी, बोरीचीवाडी आणि मिरचुलवाडी अशा तीन ठिकाणी झिंक अल्युमिनियम टाकी बांधण्याचे नक्की केले होते. त्यानुसार चाहुचीवाडी येथे सहा लाख लिटर पाणी साठवण होऊ शकेल अशी टाकी बांधण्यात आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर सचिव शामलाल गोयल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे,  जिल्हा परिषदेचे

उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) पी. एम. साळूंखे, कर्जत तालुका गट विकास अधिकारी बी. एस. पुरी आदींनी त्या झिंक अल्युमिनियम पाण्याच्या टाकीची पाहणी केली. त्यावेळी चाहुचीवाडीतील ग्रामपंचायत सदस्या निलम वसंत ढोले, प्रकाश निरगुडा, जानकी पारधी, ग्रामपंचायत सदस्य अशोक दहिवलीकर यांच्यासह  माजी सदस्य अरूण बदे, विनोद मोरे यांनी कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील पाणी टंचाईची माहिती दिली.

– झिंक पाण्याच्या टाकीत पावसाचे पाणी अडविले जाणार असल्याने ग्रामपंचायतीला कोणताही नवीन खर्च येणार नाही. पाणी टंचाई भागात झिंक टाकीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शासन पाणीटंचाईग्रस्त भागात हा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करील.

-शामलाल गोयल, अप्पर सचिव, पाणी पुरवठा विभाग.

– कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील चाहुचीवाडी, मिरचुलवाडी आणि बोरीचीवाडी या ठिकाणी असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार आमच्या आदिवासी समाजासाठी महत्त्वाचा आहे.

   -नीलम ढोले, ग्रा. पं. सदस्या

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply