Breaking News

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली.
सभागृहात मुद्दा उपस्थित करताना आमदार महेश बालदी यांनी म्हटले की, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जमिनी घेऊन सिडकोची निर्मिती झाली आणि त्या वेळेला या जिल्ह्यातील 95 गावांच्या गावठाणांसोबत जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यानंतर गावठाण विस्तार न होता आणि त्या अनुषंगाने गावठाण विस्तार योजना न राबविल्यामुळे सिडकोला विकलेल्या आपल्याच जागेत भूमिपुत्रांना नैसर्गिक गरजेपोटी घरे बांधावी लागली आहेत. ही घरे नियमित करावीत यासाठी आमचे लोकनेते कै. दि.बा. पाटीलसाहेबांनी अनेकवेळा मागणी केली, संघर्ष केला. या संदर्भात कधी 200 मीटर, तर कधी 250 मीटर, तर कधी क्लस्टर प्रस्ताव आणला. अनेक गावांमध्ये 250 मीटर पलिकडे घरे बांधलेली आहेत आणि त्यावर नोटीस देऊन सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई केली जाते. ती कारवाई थांबवावी व तसे सिडकोला निर्देश द्यावेत तसेच विशेष म्हणजे अनेक योजनांचा प्रकल्पग्रस्त भुमिपुत्राला उपयोग झाला नाही. त्यामुळे 250 मीटरचे बंधन संपवून किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply