Breaking News

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. त्यांच्यासोबत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडेपाच ते सहा लाखांच्या आसपास असून झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणार्‍या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे एकमेव नाट्यगृह आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत.
पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पद्धतीने विकसित होत असलेला विभाग असून त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाट्यगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी पाच हजार चौ.मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे.

पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याचप्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी, अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply