Breaking News

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

कर्जत, नेरळ : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील चिकनपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिरपाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. पती, पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मयत झालेली विवाहित महिला ही सात महिन्यांची गरोदर असून त्या आरोग्य विभागात आशासेविका म्हणून कार्यरत आहेत. घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचा खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे.
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चिकणपाडा हे मुस्लिम बहुल गाव असून या गावाला लागून पोशीर पाडा हे हिंदूंची वस्ती लहानशी वस्ती आहे. त्या ठिकाणी 15 वर्षांपूर्वी कळंब जवळील बोरगाव येथील जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली होती आणि त्या ठिकाणी घर बांधून ते कुटुंब राहू लागले. जैतू पाटील यांच्या मदन आणि हनुमंत या दोन्ही मुलांचे विवाहदेखील चिकणपाडामधील पोशिरपाडा येथील घरी झाली आहेत. 13 वर्षांपूर्वी जैतू पाटील यांच्या मोठ्या मुलाचे मदन पाटील यांचे लग्न झाल्यानंतर जैतू पाटील हे आपल्या पत्नीसह बोरगाव येथे राहायला गेले. त्यामुळे त्या घरात मदन तसेच त्याची पत्नी मुलगा आणि भाऊ हनुमंत जैतू पाटील असे कुटुंब राहत होते. हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या तेथे आरोग्य विभागात आशासेविका म्हणून काम करीत होत्या.
जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन जैतू पाटील यांचे नावे होते. त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आपला भाऊ मदन सोबत सातत्याने वाद घालत होता. यावर्षी त्यांच्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, मात्र हनुमंत जैतू पाटील याने आपल्या पत्नीला माहेरी भडवळ येथे पाठवून दिले होते. सात सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात होते. सकाळी नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात विवेक मदन पाटील (वय 10) या मुलाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबाची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या कुटुंबाकडे धाव घेतली.
घरात मदन जैतू पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तोपर्यंत नेरळ पोलीस तेथे पोहचले होते. घटनास्थळी काही वेळाने पोलीस उप अधीक्षक धूळदेव टेले हेदेखील पोहचले. सर्व तिन्ही मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदन करण्यासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा तपास नेरळ पोलीस करीत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी त्या घरातील चौथा सदस्य असलेल्या हनुमंत जैतू पाटील यास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अनीशा मदन पाटील यांचे माहेर हे याच चिकनपाडा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील माले गावातील आहे. त्या मृत विवाहितेचा भाऊ रुपेश यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात त्यांनी अर्धे घर नावावर करीत नाही म्हणून हनुमंत जैतू पाटील यानेच त्या तिघांना ठार केले असल्याचा दावा केला आहे.

क्रूरतेची सीमापार

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले असल्याने आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असताना पोशिर गावातील चिकनपाडा या गावात पाटील कुटूंबावर ओढवलेली परिस्थिती यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेने रायगड जिल्हा हादरून गेला आहे. आरोपी खुनीने सात महिन्यांच्या गरोदर महिलेलादेखील मारून टाकून तिच्या आठ वर्षांच्या मुलालादेखील संपविल्याने क्रूरतेची सीमा ओलांडलेली दिसत आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply