मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली.
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, सन 2023च्या उपलब्ध माहितीनुसार राज्यात सुमारे 2.27 लक्ष क्षयरोग रुग्ण आणि जून 2024 अखेरीस 1.10 लक्ष क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. 3 एफडीसी ए या औषधांचा एप्रिल 2023मध्ये तुटवडा निर्माण झाला होता. तथापि, हा तुटवडा भरून काढण्यासाठी स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1.63 कोटी रुपये एवढा निधी जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आला तसेच आवश्यकते प्रमाणे 3 एफडीसी ए औषधांच्या सुट्या स्वरूपातील गोळ्या रुग्णांना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय स्तरावर औषध खरेदीला झालेल्या विलंबामुळे केंद्रीय क्षयरोग विभागाकडील 2 फेब्रुवारी 2024च्या पत्रानुसार राज्य शासनाला स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय क्षयरोग विभागाकडून या औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. मे 2024पासून पुरवठा सुरळीत सुरू आहे. क्षयरोग रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधापैकी 3 एफडीसी ए या औषधाचा तुटवडा केंद्रीय स्तरावर निर्माण झाला होता व उर्वरित 4 एफडीसी ए, 3 एफडीसी पी, 2 एफडीसी पी इतर औषधांचा सुरळीत पुरवठा होता. राज्य शासनामार्फत क्षयरुग्णाला लागणार्या 3 एफडीसी ए औषधांचा पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे मार्च 2024मध्ये प्रत्येक जिल्ह्यांना 3 एफडीसी ए औषधांची तत्काळ खरेदी करता यावी यासाठी एकूण अनुदान रु 1.63 कोटी राज्यातील सर्व जिल्हा स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 3 एफडीसी एच्या औषधांची खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 4.95 कोटी रुपयांची तरतूद करून दोन महिने पुरेल इतक्या औषधांची खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र खरेदी प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेली असून औषध पुरवठा सुरू झालेला आहे. 3 एफडीसी ए या औषधाऐवजी 3 एफडीसी ए मधील उपलब्ध औषधाचे घटक सुट्टे स्वरुपात राज्यात मुबलक प्रमाणात मार्चअखेर उपलब्ध असल्याने तात्पुरत्या स्वरूपात रिफाम्पिसिन 300 एमजी (उपलब्ध गोळ्या 186807), रिफाम्पिसिन 450 एमजी (उपलब्ध गोळ्या 128254), इथाम्बुटोल 800 एमजी (उपलब्ध गोळ्या 147598) आइसोनियाझिड 100 एमजी (उपलब्ध गोळ्या 3391016), आइसोनियाझिड 300 एमजी (उपलब्ध गोळ्या 10772596) यांचा आवश्यकतेप्रमाणे वापर एप्रिल 2024मध्ये करण्यात आला आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.