Breaking News

डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने वाटचाल

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे उद्गार; बौद्धजन पं. स.तर्फे हृद्य सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून चालत असल्यामुळे मी माझ्या जीवनात चांगल्या प्रकारे यश मिळवित गेलो, जनमानसात प्रतिष्ठा उमटवित गेलो आणि अधिकाराच्या पदावर जाऊन बसलो. ही सर्व किमया महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने मिळाली, जे मी आज अभिमानाने सांगतो आहे. बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने माझ्या सत्कार होतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे उद्गार पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी काढले. बौद्धजन पंचायत समिती विभाग क्र. 57च्या (पनवेल) शहरातील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर भवनात माता रमाबाई अांबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेडकर चळवळीतील श्रेष्ठ कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व विभागीय महिला मंडळांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी श्री. बिनेदार बोलत होेते. समाजाच्या तळागाळातील बंधू-भगिनींपर्यंत आंबेडकरी चळवळ व विचार पोहोचविण्याचे कार्य बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायाने केले पाहिजे. बौद्धजन पंचायत समिती आज धाार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपला नोकरी-धंदा संभाळून समाजसेवा करीत आहेत, हे भूषणावह आहे. त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, अशा शब्दांत श्री. बिनेदार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सत्काराला उत्तर देताना महिलाशक्तीचे महत्त्व पटवून देऊन महिलांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे येऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन केले. बौद्धजन पंचायत समितीच्या कार्याची कार्याध्यक्ष किशोरे मोरे व सरचिटणीस लक्ष्मण भगत यांनी माहिती दिली. या समारंभाचे अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती विभाग क्र. 57चे विभाग प्रतिनिधी प्रमोद सावंत हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश लोखंडे, सूत्रसंचालन संतोष कांबळे व प्रतिक पवार यांनी केले; तर आभार विजय पवार व आतिष साळवी यांनी मानले. या कार्यक्रमास उसर्ली ग्रामपंचायत सदस्य स्नेहल नांदावडेकर, सुरेश कांबळे, जी. बी. कदम, बौद्धाचार्य हिरामण जोशी, सिद्धार्थ पवार, वैभव मोहिते, रवींद्र जाधव, श्रीधर कदम, संजय तांबे, प्रभाकर जाधव, चंदू कांबळे, सुरेश मोहिते, सुनील त्रिशूळ, सुधीर कांबळे, उत्तम पवार, राजेश जाधव, आशीष गाडे, रमेश मोहिते, सुनील रुके उपस्थित होते.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply