Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना एक लाख मतांची आघाडी देणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगतानाच खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 12) केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप, मनसे व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुती पदाधिकारी मेळावा पनवेलजवळील आकुर्ली येथील काकाजीनी वाडी या ठिकाणी झाला. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पीआरपीचे सीताराम कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, भीमसेन माळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा चव्हाण, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, रमेश पाटील, प्रभाकर कांबळे, रूपेश ठोंबरे, सचिन तांबे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे. हे सर्वजण लोककल्याणकारी कार्य करीत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून काम करताना जनसंपर्क कायम ठेवला तसेच लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार त्यांना संसदेत पाठवणार आहेत, पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती यशस्वी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात घरोघरी धनुष्यबाण निशाणी पोहचवा, असे सांगून खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
देश सुरक्षित हातात असण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी हवेत -खासदार श्रीरंग बारणे
उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत माझ्यावर विश्वास टाकला आणि पुन्हा लोकसभेसाठी महायुतीने मला संधी दिली आहे. पनवेल, रायगडच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आणि त्यांची सोडवणूक करण्याचे काम केले. देश सुरक्षित हातात असला पाहिजे यासाठी पुन्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच देशाला हवे आहेत. जगात आपल्या देशाची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. महायुती म्हणून पूर्वीपेक्षा ताकद वाढली आहे आणि ही एकसंध ताकद मतांची मोठी आघाडी देणार आहे. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि मित्रपक्षातील नेत्यांच्या ताकदीने पनवेलमधून सर्वाधिक मते मिळतील असा विश्वासही बारणे यांनी व्यक्त केला. दोन्ही निवडणुकीत त्यांनी प्रचंड काम केले आहे हे मी कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करतानाच मी केलेल्या कार्याचा विकासपर्व या जाहीरनाम्यात उल्लेख आहे आणि यापुढेही जनतेसाठी विकासपर्व सुरूच ठेवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
विकासकामे अशीच सुरू राहण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार काळाची गरज -आमदार प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशात एनडीएचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना अनेक निर्णय आणि योजना लोककल्याणासाठी त्यांनी अमलात आणल्या. त्यामुळे आज आपला भारत देश एक मोठी ताकद म्हणून जगात सक्षमपणे उभा राहू शकला आहे. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिंकलेला विश्वास ही आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. आपल्या देशाचे नव जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार चारसो पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. केंद्र व राज्य सरकार जनतेच्या विकासासाठी काम करीत आहे. प्रत्येक गावात, प्रभागात विकासकामे अशीच सुरू राहण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार काळाची गरज आहे. खासदार श्रीरंग बारणे पुन्हा निवडून आल्यानंतर हा वेग वाढणार असून केंद्राच्या अखत्यारितील जनतेची कामे हक्काने होणार आहेत, असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दिवस-रात्र काम करतात, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त फेसबुकवर काम करीत होते. त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेले आणि त्यांच्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचे माजी आमदार बँक घोटाळ्यामुळे तळोजा जेलमध्ये आहेत. ठेवीदारांचे 530 कोटी रुपये खाणारे कुठल्या तोंडाने मते मागणार आहेत, असा सवाल उपस्थित करतानाच लोक त्यांना जाब विचारणारच असे सांगून मोदीजींच्या विमा निर्णयामुळे पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मिळाल्या आणि हे केंद्र सरकारच्या निर्णयामुळेच शक्य झाले. लोकांचे पैसे बुडविणारे मते मागतात, तर कामाच्या जोरावर आप्पा बारणे हक्काने मत मागत आहेत. त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पीआरपीचे सीताराम कांबळे, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, शिवसेनेचे रामदास शेवाळे, परेश पाटील, प्रेरणा चव्हाण यांचीही समयोचित भाषणे झाली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply