Breaking News

माथेरानच्या जंगलाचे वनसंरक्षण आणि संवर्धन

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिश काळापासून 100% प्रदूषण मुक्त आहे.त्यामुळे  येथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 8 ते 10 लक्ष पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. माथेरान येथे पर्यटन हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथील सर्व विकासकामे ही वाहनांना बंदी असल्यामुळे मानवी श्रमशक्तीद्वारे केली जातात, त्यातही अनंत अडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे पर्यटक आले तर माथेरान टिकेल आणि माथेरान टिकण्यासाठी माथेरानला येणारे प्रावसी वाहतूक मार्ग आणखी बळकट केले पाहिजेत यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मिनिट्रेनसाठी नवीन इंजिने आली असून घाट रस्ता अद्ययावत बनत आहे. मात्र त्या प्रावसी मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे संभाव्य धोके निर्माण झाले असून ते धोके बाजूला करण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषद नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे.

माथेरानचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील शेकडो वर्षांपासूनची वनसंपदा! पण अलीकडील काळात ती टिकविण्याचे आव्हान समोर असून या कामी आपली भरीव मदत पुढील कामांत अपेक्षित आहे, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

साँईल कन्झर्वेशन 

माथेरानमध्ये दरवर्षी किमान 300 ते 400 इंच इतका पाऊस पडतो. 26 जुलै व 27 जुलै 2005 रोजीच्या अतिवृष्टीमुळे माथेरान हद्दीतील अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन डोंगर उताराचा बराचसा भाग नामशेष झालेला आहे. तसेच माथेरानमधील भूस्तर हा पावसाळी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जात असल्याने जमिनीची धूप दिवसेंदिवस वाढते आहे. यामुळे पावसाळ्यात बरीचशी झाडे उन्मळून पडतात. असेच चालू राहिल्यास माथेरानच्या पर्यावरणाचा र्‍हास होऊ शकतो.

माथेरानच्या पायथ्याशी मोरबे धरण असून सदर धरणातील पाणीपुरवठा नवी मुंबई तसेच ठाणे या शहरांना होतो. माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जमिनीच्या धुपीमुळे सदरची माती धरणात जाऊन धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. तरी माथेरानमधील पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने तसेच जमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने धूप प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. याकामी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी निधीची गरज आहे.

वृक्षारोपणाचे संवर्धन

माथेरान व आसपासचा परिसर केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. माथेरान शहर हे ’माथेरान भूखंड आणि बाजार भूखंड’ असे विभागले आहे. तसेच इतर सर्व जमीन महसूल व वन विभागाची आहे.

माथेरान हे थंड हवेचे प्रदूषणमुक्त असलेले नैसर्गिक ठिकाण आहे आणि येथील शेकडो वर्षांपासून असलेली दुर्मिळ वनसंपदा हा इथला नैसर्गिक अमूल्य ठेवाच आहे. तो जतन आणि संवर्धन करण्यासाठी वनविभागाच्या जमीन संरक्षित करणे अति गरजेचे आहे. माथेरान शहरातील वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व जमिनींना वायर फेन्सिंग केल्यास प्रतिवर्षी नगर परिषद, वनविभाग व सेवाभावी संस्थांकडून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचे संरक्षण व संवर्धन होईल. तसेच वनविभागाच्या जागेची निश्चिती होऊन या वनविभागाच्या जागेत  कळत-नकळत काही प्रमाणात होणारी अतिक्रमणे देखील होणार नाहीत.

धोकादायक ठिकाणी नेट अत्यावश्यक

माथेरान हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून 803 मीटर म्हणजेच सुमारे 2636 फूट इतक्या उंचीवर डोंगरमाथ्यावर वसले असून नेरळ मार्गे माथेरानला येण्यासाठी सात किमीचा घाट रस्ता आहे. या घाट रस्त्यातूनच  नेरळ – माथेरान टॅक्सी सेवा आणि ’कर्जत – नेरळ माथेरान-कर्जत’ अशी मिनी बस सेवा दिवसभर कार्यरत आहे.

या व्यतिरिक्त खाजगी वाहन तसेच ट्रेकिंगच्या माध्यमातून पायी चालत येणारे पर्यटक यांचादेखील समावेश असतो.

माथेरानला येण्यासाठी हा एकमेव घाटरस्ता असून येथें यायला दुसरा पर्यायी रस्ता नाही. हा घाट रस्ता सन 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दस्तुरी येथील चांगभले मंदिर येथे आणि अन्य चार ठिकाणी दरड कोसळून 15 दिवस बंद होता आणि माथेरानकरांचे, बालकांचे व रुग्णांचे खूप हाल झाले होते.

या प्रसंगानंतर एकूण 13 वर्षांचा कालखंड उलटून गेला आहे. तेव्हा या घाट रस्त्यात काही धोकादायक ठिकाणी जीवित हानी टाळण्यासाठी नेट  बसविणे अति प्राधान्याचे असून अति गरजेचे आणि अति तातडीचे  आहे.

जून 2015 मध्ये या घाट रस्त्यातून प्रवास करत असताना माथेरान येथील नागरिकाला गंभीर इजा झाली होती. सन 2017 रोजीसुध्दा अनेक वेळा दरड कोसळण्याचे प्रकार घडले आणि घाट रस्ता काही काळाकरिता बंद होता. याचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर होतो.तसेच माथेरानला मोठ्या प्रमाणात होणार्‍या पावसामुळे या घाटात पाण्याचे अनेक धबधबे आहेत. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटामधील काही भाग हा अत्यंत धोकादायक झाला आहे.

ज्या प्रकारे खंडाळा-लोणावळा एक्सप्रेस हायवे लगत दरडी कोसळू नयेत म्हणून नेट बसवून रस्ता संरक्षित करण्यात आला आहे, त्याचप्रकारे नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे नेट संरक्षण होणे अति आवश्यक आहे, असे माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी म्हटले आहे.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपले स्तरावरून संबंधित विभागास वेळीच आदेश द्यावेत असे आवाहन माथेरानच्या नगराध्यक्ष यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले आहे.

झाडांचे सर्वेक्षण महत्त्वाचे

जातीच्या जैव विविधतेने आणि वृक्षसंपदेने नटलेले आहे. येथे बर्‍याच ठिकाणी आयुर्वेदिक ओषधी वनस्पतीसुद्धा आहेत. पण याची संपूर्ण नेमकी माहिती उपलब्ध नाही. खूपदा येथे येणारे पर्यटकसुद्धा येथील वृक्षाबाबत विचारणा करतात. येथील वृक्षांची यापूर्वी गणना झाली होती. पण आता पुनःश्च गणना होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे माथेरानला किती  आणि कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? तसेच किती वनौषधी आहेत याचीही माहिती मिळू शकेल. याकामी माथेरान शहरातील वृक्षांची गणना वनविभागाकडून करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, अशी विनंती नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

पॉईंट्सवर रेलिंग बसवा

माथेरानमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी एकूण 38 विविध पॉईंट्स आहेत. केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पॉइण्टचा विकास करणे कामी निधी प्राप्त झाला होता. बहुतेक सर्वच पॉईंट्स हे अगदी कड्यालगत असल्यामुळे लहान मुले आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर पॉईंटवर जागोजागी रेलिंग केल्यास एक प्रकारे फेन्सिंग होईल.

या करिता सदरची कामे वनविभागाकडून झाल्यास योग्य होईल,असे उपवनसंरक्षक यांच्याकडून राज्य सरकारला कळविले आहे. त्यानुसार वनविभागाने काही पॉइंटला रेलिंग केली आहे. परंतु काही पॉइंट्सला अद्याप रेलिंग नसल्याने अनेकदा पॉईंटवरून पडून पर्यटकांचे अपघात झाले आहेत आणि ही माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.

साहसी खेळासाठी परवानगीची गरज

माथेरानला येणार्‍या पर्यटकांना  मनोरंजनात्मक तसेच साहसी खेळाचेसुध्दा आकर्षण असते, त्यासाठीं व्हॅली क्रॉसिंग व इतर साहसी खेळ यांना परवानगी मिळाल्यास येथील पर्यटन व्यवसायाला नक्कीच चालना मिळेल.

परिणामी येथील स्थानिक भूमिपुत्र आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणवर्ग यांना माथेरानमध्येच आपल्या कष्टावर चरितार्थ चालविण्याची एक उत्तम संधी मिळेल. याकामीसुध्दा आपण संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुधीर मनगुंटीवार यांच्याकडे केली आहे.

वरील सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, परंतु निधी अभावी या उपाययोजना प्रलंबित राहिल्या आहेत. तरी माथेरानची पर्यटनवृद्धी होण्याकामी, येथील विकासकामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी आपले भरीव सहकार्य अत्यावश्यक असून संबंधित विभागाला निर्देश देऊन माथेरानच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करावा, अशी विनंती राचज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्याकडे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केली आहे.

-संतोष पेरणे

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply